पुणे : स्वर्णव चव्हाण उर्फ 'डुग्गू' (Duggu) हा 4 वर्षांचा चिमुरडा 8 दिवसांनी अखेर सापडला. 'डुग्गू' आज दुपारी वाकड जवळील पुनावळे ब्रीजजवळ सापडला. त्याला या ठिकाणी सोडून देण्यात आलं होतं. पोलिसांनी डुग्गूला शोधण्यासाठी जंग जंग पछाडलं होतं. जवळपास 300 पेक्षा अधिक पोलीस कर्मचारी डुग्गूला शोधत होते. (swarnav alias duggu satish chavan found in pune but what about say police over to this case)
डुग्गूला पुनावळे ब्रीजजवळ सुरक्षारक्षक दादाराव जाधव यांच्या कडे सोपवून त्या नराधमाने पळ काढला. डुग्गूच्या बॅगवर त्याच्या घरचा मोबाईल नंबर होता. या क्रमांकावर संपर्क साधल्यानंतर अखेर डुग्गू सापडला. आपल्या काळजाचा तुकडा सुखरुप सापडल्याने गुड्डूच्या आई-वडिलांनी पोलिसांचे आभार मानले. तसेच दादाराव जाधवांचंही कौतुक केलं जातं आहे. डुग्गू सापडल्याच्या आनंदात लोकांनी पेढे वाटून आनंदं साजरा केला.
डुग्गूचा थांगपत्ता लागवा यासाठी नेटीझन्सनेही खूप प्रयत्न केले होते. डुग्गू 11 जानेवारीला हरवला होता. त्यानंतर स्थानिक पोलिसांमध्ये या प्रकरणी तक्रार दाखल करण्यात आली होती.
डुग्गू सुखरुप सापडल्यानंतर तो इतके दिवस कुठे होता, हे असे अनेक प्रश्न आता उपस्थित होत आहे.याबाबत पोलिसांकडून नेमकी काय माहिती देण्यात आली, हे आपण जाणून घेऊयात.
पोलिसांनी काय म्हटलं?
"या सर्व प्रकरणी आम्ही सखोल तपास करत आहोत. या प्रकरणाचा तपास युद्धपातळीवर सुरु होता आणि तो राहिल. या प्रकरणाच्या मुळाशी पुणे पोलीस 100 टक्के जातील. आमच्याकडे योग्य धागेदोरे आहेत. आता आम्ही तपास आणखी वेगाने करुन सर्व सत्य पोलीस समोर आणतील", असा विश्वास पोलीस सहआयुक्त डॉ. रविंद्र शिसवे यांनी व्यक्त केला.
"आम्ही तपासाच्या अंतिम टप्प्यात आहोत. या क्षणाला अधिक माहिती देणं उचित राहणार नाही. या प्रकरणात कोणतीही बाधा येईल, असं कोणतही वृत्त माध्यमांनी देऊ नये", असं आवाहनही डॉ. रविंद्र शिसवे यांनी केलं.