ठाणे : ठाणे मध्यवर्ती कारागृहाला सुतारकाम, शिवणकाम, धोबीकाम, यंत्रमाग यांसारख्या विविध कामांतून तब्बल एक कोटी रुपयांचं उत्पन्न मिळालंय. कारागृहातल्या 60 कैद्यांनी ही किमया घडवून आणलीय.
कैद्यांच्या हाताला काम देऊन त्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी ठाणे मध्यवर्ती कारागृहात कारखाना विभाग सुरु आहे. यांत सुतारकाम, शिवणकाम, धोबीकाम, यंत्रमाग, बेकरी, फरसाण आदी काम सुरू असते. बेड्स, डायनिंग टेबल, देव्हारे, कपडे शिवणे, ओट्स, बिस्किट्स, फरसाण, कापड बनवणे यांसारखे विविध वस्तू आणि खाद्यपदार्थ बनविले जातात.
2016 - 17 या आर्थिक वर्षात 60 कैद्यांनी तब्बल एक कोटींहून अधिक उत्पन्न या कामातून मिळवून दिलं आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत हे उत्पन्न जास्त आहे. कैद्यांना शिक्षा भोगून बाहेर पडल्यावर काम मिळवण्यासाठी कोणतीही अडचण येणार नाही असा विश्वास कारागृह अधीक्षक नितीन वायचळ यांनी व्यक्त केलाय.