नवी मुंबई : रुग्णवाहिका वेळेत न आल्यामुळे एका ५० वर्षीय व्यक्तीचा मृतदेह सहा तास तसाच पडून राहिला होता. माणुसकीला काळीमा फासणारा हा प्रकार नवी मुंबईमधील तुर्भे स्टोअर भागात घडला. के. के. रोड परिसरात राहणारे हे रहिवासी शुक्रवारी संध्याकाळी पाच वाजता डम्पिंग ग्राऊंडच्या नजीक असलेल्या शौचालयात गेले होते. तिथेच त्यांचा मृत्यू झाला.
एक व्यक्ती पडून आहे. याबाबतची माहिती स्थानिक रहिवाशांनी नवी मुंबई महापालिकेच्या आरोग्य विभागाला दिली. मात्र रुग्णवाहिका तात्काळ उपलब्ध न झाल्यामुळे त्यांचा मृतदेह रात्री अकरा वाजता शौचालयातून बाहेर काढून वाशी रुग्णालयात हलवण्यात आला. कोरोनाची टेस्ट झाल्यानंतर त्यांचा मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात येणार आहे.
दरम्यान, दुसऱ्या एक घटनेत हिंगोली नगर परिषदेत कार्यरत असलेल्या ४३ वर्षीय सफाई कामगाराचा अचानक मृत्यू झाला. कर्तव्यावर असताना मृत्यू झाला आहे. या मृत कामगाराचेनाव गुप्त ठेवले असून त्याचा मृत्यू कोणत्या कारणाने झाला हे अद्याप समजू शकल नाही. खबरदारीचा उपाय म्हणून प्रशासनाच्या वतीने मृत कामगाराचा थ्रोट स्वॅब घेण्यात आला आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण सुरक्षेसह कामगाराचा मृतदेह जिल्हा सामान्य रुग्णालयात नेण्यात आला होता. तपासणी अहवालानंतरच या कामगाराचा मृत्यू कशाने झाला हे निष्पन्न होणार आहे.