Badlapur Crime News : बदलापूरमध्ये भर रस्त्यात गोळीबाराचा थरार पहायला मिळाला आहे. बदलापूरात झालेल्या या गोळीबारात एक तरुण गंभीर जखमी झाला आहे. जखमी तरुण उल्हासनगरमधील गुन्हेगार असल्याचे समजते. जखमी तरुणाची प्रकृती चिंताजनक आहे. त्याला कळवा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
बदलापूरच्या कात्रप पनवेल हायवे रोडवर गोळीबार झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या गोळीबारात या तरुणाच्या खांद्यावर गोळी लागल्याने तो गंभीर जखमी झाला आहे. त्याला सुरुवातीला उल्हासनगरच्या मध्यवर्ती रुग्णालयात त्यानंतर प्रकृती गंभीर असल्याने कळवा रुग्णालयात हलविण्यात आले आहे. आता याप्रकरणी पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून अधिक तपास सुरू केला आहे.
सुनील प्रजापती उर्फ टक्का असं गोळी लागून जखमी झालेल्या तरुणाचं नाव आहे. सुनील उर्फ टक्का हा उल्हासनगरच्या आझाद नगर मधील रहिवासी असून त्याच्या विविध पोलीस ठाण्यात अनेक गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल असून तो तडीपार आहे. टक्का याने पोलिसांना दिलेल्या माहितीवरून शुक्रवारी सायंकाळी बदलापूर पूर्वेच्या कात्रप पनवेल हायवेरोडवर गेला असता हा गोळीबार झाला. एक गोळी त्याच्या खांद्यावर लागून शरीरात घुसली आहे. दरम्यान आज सायंकाळी टक्का याला उल्हासनगरच्या मध्यवर्ती रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले असता डॉक्टरांनी त्याची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगून कळवा रुग्णालयात हलविण्यात आले आहे. नेमकं हा गोळीबार कोणी केला? कशासाठी करण्यात आला याचा अधिक तपास पोलीस करत आहे.
बदलापूर शहरातील नामांकित उद्योजक आणि माजी नगरसेवक संजेश पातकर यांच्यावर दो अज्ञात हल्लेखोरांनी गोळीबार केला होता. या हल्ल्यात पातकर थोडक्यात बचावले. खरवई इथं पातकर यांच्या कार्यालयाबाहेर हा हल्ला झाला होता. दोन्ही हल्लेखोर दुचाकीवरुन आले होते.
बदलापूर मध्ये माथाडी कामगार संघटनेचा तालुका उपाध्यक्ष जगदीश कुडेकर यांच्यावर गोळीबार करण्याचा प्रयत्न झाला होता. जगदिश कुडेकर शिवसेना प्रणीत माथाडी कामगार संघटनेचे अंबरनाथ तालुका उपाध्यक्ष आहे. दुचाकीवरून आलेल्या दोन हल्लेखोरांनी कुडेकर याच्या दिशेने गोळीबार केला मात्र हल्लेखोरांच्या बंदुकीतून गोळ्या सुटल्या नाहीत त्यामुळे ते हल्लेखोर पळून गेले हे दोन्ही हल्लेखोर हेल्मेट आणि तोंडाला रुमाल बांधला होता त्यामुळे त्यांचे चेहेरे दिसले नाहीत.
बदलापूरचे राष्ट्रवादी कार्याध्यक्ष राम लिये यांच्या गाडीवर गोळीबार करण्यात आला होता. कर्जतजवळच्या डिकसळ गावाजवळ गोळीबाराची ही घटना घडली होती. दोन दुचाकींवरून आलेल्या चौघांनी राम लिये यांच्या कारवर 3 गोळ्या झाडल्या. राम लिये हे मुलीचा वाढदिवस असल्यानं परिवारासह एकविरेला गेले होते, तिथून परतत असताना ही घटना घडली होती.