पुणे : पिंपरी-चिंचडवड आणि पुणे महापालिका क्षेत्रात मोठ्या प्रमाणात कोरोनाचा फैलावर होत असल्याने चिंता व्यक्त करण्यात येत आहे. कोरोनाची साखळी तोडण्याबाबत काय करता येईल, याबाबत पुण्यात पालकमंत्री अजित पवार यांनी अधिकाऱ्यांची बैठक घेत कोरोना परिस्थितीचा आढावा घेतला. त्यानंतर लॉकडाऊन करण्याचे संकेत दिले. यानंतर प्रशासनाने लॉकडाऊन जाहीर केला. आता पुण्यामध्ये घोषित करण्यात आलेल्या लॉकडाऊनला येथील व्यापाऱ्यांनी विरोध केला आहे.
पुण्यामध्ये घोषित करण्यात आलेल्या लॉकडाऊनला व्यापाऱ्यांचा विरोध । व्यापारी महासंघातर्फे याबाबतचे निवेदन मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री तसेच प्रशासनाला पाठवण्यात आले आहे.#Pune #coronavirus#COVID19 @CMOMaharashtra @AjitPawarSpeaks @ashish_jadhao pic.twitter.com/qDjX3hEquw
— ZEE २४ तास (@zee24taasnews) July 11, 2020
पुण्यातील व्यापारी महासंघातर्फे अनलॉक करण्याची मागणी करण्यात येत आहे. लॉकडाऊनमुळे व्यापाऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे. त्यामुळे लॉकडाऊन हटविण्याची मागणी त्यांनी केली आहे. व्यापाऱ्यांनी याबाबतचे निवेदन मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री तसेच प्रशासनाला पाठविले आहे. लॉकडाऊन मुळे व्यापाऱ्यांचे मोठे नुकसान होत असून यांचा व्यवसाय धोक्यात आला आहे. व्यापारी वर्ग आर्थिक तसेच मानसिक तणावाखाली आहे, अशा परिस्थितीत पुण्यामध्ये घोषित करण्यात आलेला लोकडाऊन मागे घेण्यात यावा, अशी विनंती व्यापारी महासंघाने केली आहे.
दरम्यान, शुक्रवारी अजित पवार यांनी कडक लॉकडाऊनचा इशारा दिला होता. काहीवेळा लोक नियम पाळत नसतील, तर लॉकडाऊनसारखे निर्णय घेणे भाग असते, असे वक्तव्य उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कालच केले होते. पुणे जिल्हा सोमवारी मध्यरात्रीपासून लॉकडाऊन करण्याच्या निर्णयावर त्यांनी भाष्य केले. त्यांनी म्हटले की, आपण इंग्लंडचे उदाहरण घेऊ शकतो. त्याठिकाणी पुन्हा लॉकडाऊन करण्यात आले आहे.
तसेच, ज्या भागात कोरोनाचे रुग्ण वाढतील तिथे लॉकडाऊन करण्यात येईल, असा इशाराही अजित पवार यांनी दिला. मात्र, आता नव्याने लॉकडाऊन करतोय म्हणजे पहिले लॉकडाऊन चुकले, असा अर्थ होत नाही, असे स्पष्टीकरणही यावेळी अजित पवार यांनी दिले. त्यानंतर आता व्यापाऱ्यांनी लॉकडाऊन हटविण्याची मागणी केली आहे. त्याबाबत अजित पवार काय निर्णय घेणार याकडे लक्ष लागले आहे.