CM Shinde On Shivaji Maharaj Statue Collapses: सिंधुदुर्गमधील मालवण येथील राजकोट किल्ल्यावरचा छत्रपती शिवाजी महाराजांचा पूर्णाकृती पुतळा कोसळ्यानंतर राज्यामध्ये सत्ताधारी विरुद्ध विरोधक असे आरोप प्रत्यारोप सुरु झाले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते 4 डिसेंबर 2023 रोजी नौदल दिनानिमित्त लोकार्पण करण्यात आलेला हा पुतळा अवघ्या आठ महिन्यांमध्ये कोसळल्याच्या मुद्द्यावरुन विरोधकांनी राज्यामध्ये सत्तेत असलेल्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या सरकावर निशाणा साधला आहे. असं असतानाच दुसरीकडे राज्य सरकारकडून या प्रकरणाची चौकशी सुरु झाली असून नौदलाने हा पुतळा उभारला होता असं सांगितलं जात आहे. नौदलाचे अधिकारी, फॉरेन्सिक टीमने घटनास्थळी जाऊन पहाणीही केली आहे. याचदरम्यान आता उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेनं हा पुतळा कोसळल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी दिलेल्या स्पष्टीकरणावरुन 'सामना'मधून निशाणा साधला आहे. यापूर्वी उभारण्यात आलेल्या पुतळ्यांचा उल्लेख करत उद्धव ठाकरेंच्या पक्षाने मुख्यमंत्र्यांबरोबरच सरकारला लक्ष्य केलं आहे.
"सिंधुदुर्गमधील मालवण येथील राजकोट किल्ल्यावरील शिल्पाच्या मजबुतीची, सुरक्षेची कोणतीही शहानिशा न करता हे शिल्प सिंधुदुर्गातील राजकोटावर उभे केले गेले. या पुतळ्याची अल्पावधीतच दुरवस्था झाली," असा आरोप ठाकरेंच्या पक्षाने, 'सामना'च्या अग्रलेखातून केली आहे. "ज्या 18 बोल्टच्या सहाय्याने पुतळा उभा केला ते 18 बोल्ट गंजले व पुतळाही विद्रूप झाला. तो पुतळा आता चौथऱ्यावरून कोसळून पडला व मुख्यमंत्री हसत सांगत आहेत की, राजकोट किल्ल्यावर छत्रपती शिवरायांचा नवा पुतळा उभा करू. हा निर्लज्जपणाचा कळस आहे. मुख्यमंत्री म्हणतात, जोरदार वारा, समुद्राच्या बदलत्या हवामानामुळे पुतळा पडला. ते खोटे बोलत आहेत. बेफिकिरी, घाणेरडे राजकारण, ठाण्यातल्या लाडक्या ठेकेदारांना पुतळा उभारणीचे दिलेले काम व त्यात झालेली खाऊबाजी यामुळे महाराजांचा पुतळा कोसळला," अशी टीका ठाकरेंच्या शिवसेनेनं केली आहे.
पुढे काही उदाहरणं देताना अगदी नेहरुंचाही उल्लेख ठाकरेंच्या पक्षाने केला आहे. "शिवरायांनी बांधलेला किल्ले सिंधुदुर्ग 375 वर्षे भर समुद्रात हाच वादळवारा, लाटा सहन करीत उभा आहे. गिरगावच्या चौपाटीवर समुद्राच्या शेजारी लोकमान्य टिळकांचा पुतळा 1933 साली उभा केला. तो ठामपणे उभा आहे. 1957 साली किल्ले प्रतापगडावर पंतप्रधान पंडित नेहरूंनी शिवरायांच्या पुतळ्याचे अनावरण केले तो पुतळाही जसाच्या तसा आहे, पण सिंधुदुर्गातील राजकोटावरील पुतळा आठ महिन्यांत कोसळला," असं ठाकरेंच्या पक्षाने म्हटलं आहे.
Sindhudurg - Fort that proudly echoes the timeless tales of valour!
Spread across an island off the coast of crescent shaped Malvan beach, the fort was once the coastal capital of the Maratha Empire. #DekhoApnaDesh @maha_tourism
PC: Piyush Tanpure pic.twitter.com/DTKBWYk5QK
— Incredible!ndia (@incredibleindia) May 6, 2022
"तुमचे पापी हात पुन्हा शिवरायांच्या पुतळ्यास लागता कामा नयेत. तुमच्या पापाच्या कमाईचा दमडाही या पवित्र कार्यात लागता कामा नये. शिवछत्रपतींच्या पराक्रमाचा साक्षीदार हाच सिंधुदुर्ग किल्ला आहे. लढण्याची प्रेरणा याच सिंधुदुर्गाने महाराष्ट्राला दिली. त्या किल्ल्यावरील छत्रपतींचा पुतळा कोसळला. मुख्यमंत्री मिंधे, तुम्हाला माफी नाही. सत्ता सोडा, प्रायश्चित्त घ्या, असे कोडग्यांना सांगणे व्यर्थ ठरते, पण तुम्हाला जावेच लागेल. शिवप्रेमी जनताच तुम्हाला घालवेल. लक्षात ठेवा," असं लेखाच्या शेवटी म्हटलं आहे.