Mohan Bhagwat Comment About God: "संदर्भासहित स्पष्टीकरण द्या अशा प्रकारचा प्रश्न पूर्वीच्या शालेय प्रश्नपत्रिकेत हमखास असे. कोण कोणास व का म्हणाले? असाही एक प्रश्न त्या वेळी असे. सरसंघचालक मोहन भागवत यांनी एक प्रश्न विचारून लोकांना संदर्भासहित स्पष्टीकरण करायला भाग पाडले आहे. आपण देव झालो आहोत असे परस्पर कुणीच मानू नये. कुणी देव आहेत की नाही हे लोकांना ठरवू दे, असा स्पष्ट विचार मांडून भागवतांनी मोदींच्या तंबूत उंट सोडला आहे," असं उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेनं म्हटलं आहे. "काही दिवसांपूर्वी भागवतांनी सांगितले होते, एक माणूस सुपरमॅन बनू इच्छितोय. त्यानंतर देवता व परमेश्वर. तो विश्वरूपाचीही आकांक्षा ठेवून आहे, पण भविष्यात काय घडेल हे कोणीच सांगू शकत नाही. सरसंघचालकांच्या या विधानामुळे देशातील अंधभक्त कपाळावर झंडू बाम चोळत बसले असावेत," असा टोला उद्धव ठाकरेंच्या पक्षाने लगावला आहे.
"पंतप्रधान मोदी यांनी लोकसभा निवडणूक प्रचार काळात स्वतःला ‘नॉन-बायोलॉजिकल’ व्यक्ती घोषित केले होते. म्हणजेच आपण ईश्वराने पाठवलेला पुत्र आहोत असे त्यांनी घोषित केले. त्याआधी अनेक अंधभक्तांनीही मोदी हे विष्णूचे अवतार असून ते अजिंक्य किंवा अपराजित असल्याचे जाहीर केले होते. धर्म ही अफूचीच गोळी असल्याने देशातील अंधभक्तांनी यावर माना डोलवल्या. या देशात संत-महात्म्यांची कमी नाही. पण संत आसाराम, संत राम रहीमसारखे अनेक स्वयंभू अवतार खून, बलात्कार अशा गुह्यांत तुरुंगात गेले व या संतांना संरक्षण देण्याचे काम मोदी राज्यात झाले. तेच मोदी स्वतःला ‘भगवान’ मानतात ही गंमत आहे. काही दशकांपूर्वी आचार्य रजनीश यांनी स्वतःला ‘भगवान’ म्हणून घोषित केले होते. त्यानंतर पंतप्रधान मोदी हे दुसरे, पण त्यांच्या देवत्वावर सरसंघचालक भागवत यांनी थंड पाणी ओतले आहे," असं 'सामना'च्या अग्रलेखात म्हटलं आहे.
"महाभारतात भगवान श्रीकृष्णाने सांगितले आहे, यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत। अभ्युत्थानमधर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम्।। याचा अर्थ असा की, ‘जेव्हा या पृथ्वीवर धर्मावर संकट येईल, विध्वंसक आणि विनाशकारी कार्य होतील, अधर्माचा विजय होईल, तेव्हा मी पृथ्वीवर जन्म घेईन. पृथ्वीवर अवतार घेत राहीन. ‘परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृताम् । धर्मसंस्थापनार्थाय सम्भवामि युगे युगे ।।’ या श्लोकात भगवान श्रीकृष्ण सांगत आहेत की, “साधू आणि सज्जनांच्या रक्षणासाठी, पृथ्वीवरील पापांचे निर्दालन करण्यासाठी, दुर्जन आणि पाप्यांचा विनाश करण्यासाठी आणि धर्माच्या स्थापनेसाठी मी प्रत्येक युगात पुनः पुन्हा अवतार घेत असतो व समस्त मानवजातीचे कल्याण करत राहतो.’’ नरेंद्र मोदी हे अवतारी पुरुष आहेत असे त्यांना स्वतःला वाटणे साहजिकच आहे. जगातील अनेक भोंदूबाबांना आपण अवतारी पुरुष असल्याचे वाटत असते," असा टोला ठाकरेंच्या शिवसेनेनं लागवला आहे.
"भारतात हिंदू धर्म आहे. अवताराच्या कल्पना हिंदू धर्मात आहेत, पण त्यात भोंदूपणास स्थान नाही. मानवजातीवर संकटे येतील तेव्हा मी मानव कल्याणासाठी अवतार घेईन असे श्रीकृष्ण सांगतो. देशात गेल्या दहा वर्षांत कोणते मानव कल्याण झाले? मणिपुरातील हिंसाचार रोखायला स्वयंघोषित अवतारी पुरुष पोहोचले नाहीत. कश्मीरातील हिंदू पंडितांचेही ते रक्षण करू शकले नाहीत. दंगली व कत्तली घडवून निवडणुका जिंकायच्या हे या अवतारी पुरुषाचे कार्य आहे. भगवंताने द्रौपदीची लाज राखण्यासाठी ‘अवतार’ घेतला. आज भारतात अनेक अबलांवर बलात्कार, त्यातून हत्या सुरू असताना अवतारी पुरुष वीस हजार कोटींच्या ‘पुष्पक’ विमानात बसून जगसफर करीत आहे. अवतारी पुरुषाच्या राज्यात फक्त लाडक्या उद्योगपती मित्रांची कर्जे माफ होत आहेत. काही मित्र कर्जे बुडवून पळत आहेत. सामान्य शेतकरी मात्र कर्ज झाले व जप्ती आली म्हणून आत्महत्या करीत आहे," अशी टीका लेखातून करण्यात आलेली आहे.
"एक इंचही जमीन पांडवांना देण्यास नकार दिला म्हणून धर्मरक्षणासाठी महाभारत युद्ध झाले. आज चीनने हजारो वर्ग मैल जमीन घशात घालूनही अवतारी ‘भगवान’ गप्प आहेत. भगवंतासमोर हा सर्व अनाचार व दुराचार माजला आहे. लोकसभा निवडणुकीत भगवंताचा पराभव झाला. त्यांनी बहुमत गमावले, पण तरीही ते राजसिंहासनावर टुणकन बसले. हा काही सत्याचा मार्ग नाही. हा देश आपल्या करंगळीवर उभा आहे असे सध्याच्या अवतारी पुरुषाला वाटत असेल तर तो त्यांचा भ्रम आहे. अवतारी पुरुष ज्यास हात लावतील त्याचा सत्यानाश होताना दिसतोय. गुजरातमध्ये सरदार वल्लभभाई पटेल यांच्या पुतळ्यास तडे गेले व महाराष्ट्रात छत्रपती शिवरायांची महान मूर्तीच कोसळून पडली आणि त्यामागचे गुन्हेगार मोकाट आहेत. अवतारी पुरुषाचे सैन्य हे करबुडवे, अपराधी, देशद्रोही यांनी भरलेले आहे व त्याच सैन्याच्या जोरावर ते सत्य आणि संविधानाच्या विरोधात लढत आहेत. त्यामुळे धर्म संकटात येताच अवतार घेईन असे भगवंताने सांगितले ते या अवतारी बाबाच्या बाबतीत खरे नाही. रोज खोटे बोलणे, असत्याशी संग करणे हेच त्यांचे कार्य आहे. त्यामुळे सरसंघचालकांनी सांगितले त्याप्रमाणे यांना देव किंवा अवतारी पुरुष मानता येणार नाही. लोकही मानायला तयार नाहीत. भागवतांनी अवतारी बाबाचे कान टोचले हे बरेच झाले, पण होणार काय? ‘नळी फुंकली सोनारे, इकडून तिकडे गेले वारे’ असेच घडत आले. सरसंघचालक खरे बोलले हे महत्त्वाचे. अंधभक्तांच्या तंबूत त्यामुळे खळबळ उडाली हेही नसे थोडके," असं लेखाच्या शेवटी म्हटलं आहे.