नाशिक : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबद्दल चिथावणीखोर विधान करणाऱ्या केंद्रीय मंत्री नारायण राणेंना महागात पडण्याची शक्यता आहे. राणेंच्या विधानाप्रकरणी महाड आणि नाशिकमध्ये गुन्हे दाखल झाले आहेत. राणेंचं विधान गंभीर असून त्यांना अटक करून न्यायालयासमोर हजर करण्याचे आदेश नाशिक पोलिसांनी दिले आहेत. त्यानंतर नाशिक पोलिसांचं पथक राणेंच्या अटकेसाठी रवाना झालं आहे. राणेंची जनआशीर्वाद यात्रा सध्या कोकणात आहे. आज चिपळूणमध्ये त्यांच्या यात्रेला सुरुवात होईल. तिथेच त्यांना अटक होण्याची शक्यता आहे.
युवासेनेच्या कार्यकर्त्यांनी याविरोधात तक्रार केल्यानंतर पोलिसांनी नारायण राणे यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. नाशिक पोलीस आयुक्तांनी नारायण राणेंना अटक करण्याचे निर्देश दिले आहेत. उद्धव ठाकरे यांच्याबद्दल अपशब्द वापरल्या प्रकरणी नारायण राणे यांच्यावर गुन्हा दाखल कऱण्यात आला आहे. नाशिकच्या सायबर पोलीस स्टेशनमध्ये तक्रार करण्यात आली. सेना नाशिक महानगरप्रमुख सुधाकर बडगुजर यांनी तक्रार दाखल केली आहे.
तसेच मुंबईतही नारायण राणेंविरोधात पोस्टरबाजी करण्यात आली. शिवसेनेने दादर येथे केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्याविरोधात 'कोंबडी चोर' असे पोस्टर लावण्यात आले. मात्र अवघ्या एक तासात मुंबई पोलिसांनी हे पोस्टर हटवले आहेत. असं असलं तरीही या पोस्टरचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहे. ('कोंबडी चोर' म्हणत नारायण राणेंविरोधात दादरमध्ये शिवसेनेची पोस्टरबाजी)
मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर टीका करताना केंद्रीय मंत्री नारायण राणेंची जीभ घसरली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना कानाशिलात लगावण्याचं वादग्रस्त वक्तव्य त्यांनी केलं आहे. त्यांना बोलायचा अधिकार आहे का, बाजूला एखादा सेक्रेटरी ठेवावा आणि मग माहिती घेऊन बोलावं अशी टीका नारायण राणे यांनी केली आहे.
‘त्यांचं ऍडव्हाईज कोण, त्यांनाच काही कळत नाही. ते काय आम्हाला ऍडव्हाईज करणार? ते काय डॉक्टर आहेत का? तिसऱ्या लाटेचा कुठून आवाज आला त्यांना? आणि ती पण लहान मुलांना? अपशकुनासारखं बोलू नको म्हणावं. किती वर्षे झाली देशाला स्वातंत्र्य मिळून? अरे हिरक महोत्सव काय? मी असतो तर कानाखालीच चढवली असती. हे काय देशाच्या स्वातंत्र्य दिनाची तुम्हाला माहिती नसावी?’ अशा शब्दात राणे यांनी मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधला आहे.
केंद्रीय मंत्री झाल्यानंतर नारायण राणे यांनी जनआशिर्वाद यात्रेच्या पहिल्या दिवसापासूनच मुख्यमंत्री आणि शिवसेनेवर निशाणा साधला आहे. नारायण राणेंच्या वादग्रस्त वक्तव्यामुळे नवा वाद रंगण्याची चिन्ह आहेत.