Maharashtra Weather Update : ऐन हिवाळ्यात अवकाळी पावसाने हजेरी लावल्याने आता अनेकांची तारंबळ उडाल्याचं पहायला मिळतंय. गुरूवारी अचानक राज्यात पावसाने हजेरी लावल्याने शेतकऱ्यांवर मोठं संकट ओढावलं आहे. राज्यातील अनेक भागांत पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली असल्याने शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास आता हिसकावला जाणार तर नाही ना? अशी चिंता लागून राहिली आहे. अशातच आता राज्यातील काही भागात अवकाळी पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे.
बुलढाणा जिल्ह्यात मागील दोन दिवसांपासून ढगाळ वातावरण आहे. त्याचबरोबर मुंबईत देखील पुढील 5 दिवस ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता आहे. अहमदनगरमध्ये शुक्रवारी पावसाने अचानक हजेरी लावल्याने लोकांना स्वेटर काढून छत्र्या बाहेर काढाव्या लागल्या. जळगाव जिल्ह्यात काही भागात झालेल्या अवकाळी पाऊस झाल्याने रब्बी पिकाला मोठा फटका बसलाय. तर पालघर जिल्ह्यात येत्या दोन दिवसात पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. त्याचबरोबर राज्यात पुढील पाच दिवस वातावरण अंशत ढगाळ राहण्याची शक्यता आहे.
'या' जिल्ह्यात मुसळधार पावसाची शक्यता
पुणे, कोल्हापूर, जळगाव, नाशिक, अहमदनगर, छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यांमध्ये शुक्रवारी, शनिवारी मेघगर्जनेसह पावसाचा इशारा देण्यात आलाय. यासोबतच सातारा, सांगली, सोलापूर, बीड, अकोला, अमरावती, भंडारा, बुलडाणा, गोंदिया, नागपूर या जिल्ह्यांमध्ये देखील तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता आहे.
दरम्यान, पुण्याच्या चाकण परिसराला आज रात्रीच्या सुमारास अचानक अवकाळी पावसाने झोपलं असून अचानक पडलेल्या या अवकाळी पावसाने वातावरणात गारवा निर्माण झाला असला, तरी या पावसामुळे कांदा सारख्या पिकांना मोठा फटका बसणार आहे. तर दुसरीकडे रोगराई पसरण्याचा ही धोका या अवकाळी पावसामुळे होऊ शकतो. अचानक आलेल्या पावसामुळे नागरिकांची ही तारांबळ उडाली. नगरच्या नेवासे तालुक्यातील कुकाणे, भेंडे परिसरात अवकाळी पावसाने हजेरी लावली. या पावसामुळे पावसाने उभी कांदा, गहू, हरभरा पिकांचे नुकसान होऊन उत्पादनात घट होण्याची शक्यता आहे.