Weather Update : थंडीचे दिवस आहेत म्हणून तुम्ही एखाद्या हिवाळी सहलीचा बेत आखत असाल, तर या सहलीमध्ये तुम्हाला पाऊसही साथ देऊ शकतो. काही भागांमध्ये हाच पाऊस अडचणीही निर्माण करु शकतो. कारण राज्यात पुढील किमान चार दिवस विविध भागांमध्ये कमी- जास्त स्वरुपात पावसाचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे.
मान्सूननं माघार घेतल्यानंतरचा काळ हा वादळांसाठी पूरक असतो. या काळात अनेक चक्रीवादळं निर्माण होतात. यांचं प्रमाण अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरात जास्त असतं. सध्या च्या घडीला बंगालच्या उपसागरामध्ये एक कमी दाबाचा पट्टा तयार झाला आहे. हा कमी दाबाचा पट्टा सध्या महाराष्ट्राच्या दिशेनं पुढे सरत असल्यामुळं येत्या दोन ते तीन दिवसांमध्ये राज्यात अहमदनगर, पुणे, सातारा, सांगली, रायगड, लातूर, सोलापूर, कोल्हापूर या भागांमध्ये हलक्या ते मध्यम स्वरुपाचा पाऊस 24 तारखेला बरसेल. या भागांमध्ये शुक्रवारसाठी पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला असून, मुंबईतही हाच इशारा लागू आहे. 24 ते 26 नोव्हेंबर दरम्यान मुंबई महानगराच्या काही भागात हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे.
25 नोव्हेंबरला दक्षिण आणि उत्तर कोकणासह मध्य महाराष्ट्रात पावसाची शक्यता आहे. 26 नोव्हेंबर रोजीसुद्धा अशीच परिस्थिती असेल. 27 नोव्हेंबरला मात्र उत्तर महाराष्ट्राला पाऊस चिंब भिजवणार आहे, तर पश्चिम महाराष्ट्रातून मात्र पावसाचं प्रमाण कमी होणार आहे.
हवामान तज्ज्ञांच्या माहितीनुसार डिसेंबर महिन्यात सुरु असणाऱ्या या पावसाचा हवामान बदलांशी थेट संबंध नाही. ऑक्टोबर ते डिसेंबर दरम्यान हीच प्रणाली दिसून येते. ज्याचा थेट संबंध वादळांची निर्मिती आणि कमी दाबाच्या पट्ट्याशी असतो. इथं कमी दाबाचे पट्टे महत्त्वाची भूमिका निभावतात.
दरम्यान, सध्या देशाच्या दक्षिणेकडे असणाऱ्या तामिळनाडू आणि केरळ राज्यांमध्येही पाऊस धुमाकूळ घालताना दिसत आहे. परिणामस्वरुप गोव्यापासून महाराष्ट्राच्या किनारपट्टी भागातही पावसाचीच हजेरी पाहायला मिळण्याची शक्यता आहे. या साऱ्यामध्ये थंडीचं प्रमाण मात्र कमी होताना दिसणार आहे. पण, देशाच्या उत्तरेकडी राज्य मात्र यासाठी अपवाद ठरतील. कारण, काश्मीरच्या खोऱ्यात थंडीचा कडाका वाढणार आहे. तर, उत्तराखंडच्या पर्वतीय भागासह हिमाचल प्रदेशातील डोंगराळ भागातही थंडी वाढणार आहे.