यवतमाळ : यवतमाळच्या वणी येथील निळापुर मार्गावरील अहफाज जिनिंगला आग लागल्याने जिनींग मधील कापसाच्या गंजी आगीच्या विळख्यात सापडल्या. शॉर्ट सर्कीटने लागलेल्या या आगीत ५ हजार क्विंटल कापूस खाक झाल्याचा प्रार्थमिक अंदाज असून कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले आहे. निळापुर मार्गावर मोठया प्रमाणात व्यवसायीकांनी कापसाचे जिनिंग थाटले आहे.
याठिकाणी मोठ्या प्रमाणात कापसाची आवक असून कापसाच्या गंजी लावण्यात आल्या आहेत. अहफाज जिनिंग मध्ये आज दुपारी शॉट सर्किटमुळे कापसाला आग लागली.
बघता बघता कापसाच्या गंजीने पेट घेतल्याने आगीने रौद्ररुप धारण केले. याबाबत अग्निशमन दलाला सूचना दिल्यानंतर पेटत्या कापसावर पाण्याचा मारा करण्यात आला.
यावेळी सर्वत्र धुराचे लोट पसरायला लागल्याने जिनिंग मधील कर्मचारी आणि अग्निशमन दलाला आग विझविताना अडचण निर्माण झाली होती.
सध्या कापूस जिनिंग मध्ये मोठ्या प्रमाणात कापसाची साठवणूक होत असून सुरक्षेच्या दृष्टीने उपाययोजनांचा अभाव असल्याने आगीच्या घटना घडताहेत.