विशाल करोळे, झी 24 तास संभाजीनगर : संभाजीनगर (Sambhaji Nagar) जिल्ह्यातल्या जिल्हा परिषद (Zilla Parishad) शाळांमधल्या विद्यार्थ्यांच्या घटलेल्या संख्येबाबत खळबळजनक माहिती समोर आलीय. झेडपीच्या शाळेतले विद्यार्थी शाळेच्या वेळेत मदरशांमध्ये (Madrasa) जात असल्याचं उघड झालंय. आणि ही बाब दस्तुरखुद्द प्राथमिक शाळांच्या शिक्षणाधिकाऱ्यांच्या पत्रातून पुढं आलीय. शिक्षणाधिकारी जयश्री चव्हाण यांनी गटशिक्षणाधिका-यांना लिहिलेल्या पत्रात ही धक्कादायक बाब नमूद केली आहे. आणि ३० ऑगस्टला लिहिलेलं हे पत्र झी २४ तासच्या हाती लागलंय. (zp school students are reportedly going to madrassas during school hours at sambhajinagar)
राज्यातील जिल्हा परिषद शाळांची स्थिती आधीच दयनीय बनलीय. विद्यार्थ्यांविना शाळा ओस पडतायेत अशातच या शाळांवर आता मदरशांचं संकट ओढावलंय. संभाजीनगरमध्ये जिल्हा परिषद शाळांमधले विद्यार्थी शाळेच्या वेळेत मदरशांमध्ये जात असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय. संभाजीनगरच्या शिक्षणाधिका-यांनी पाठवलेलं खळबळजनक पत्र झी २४ तासच्या हाती लागलंय. जिल्हाधिका-यांनी सर्व गटशिक्षणअधिका-यांना पत्र पाठवून याबाबत माहिती गोळा करण्याचे आदेश दिले आहेत.
हे प्रकरण केवळ शाळा सोडून मदशांमध्ये जाण्यापुरतंच मर्यादित नाही तर मदरशात जाणारी मुलं शिक्षणात प्रचंड मागे पडल्याचा शासकीय अहवालही समोर आलाय.
पहिली ते पाचवीपर्यंत उर्दू माध्यमात शिकणारी 55 % मुलं नीट वाचू शकत नाहीत. तर 50 % मुलांना गणितच येत नाही. 20 % मुलं घरातून शाळेसाठी निघतात मात्र शाळेत जात नाहीत. यातील काही मुलं शाळा सोडून मदरशांमध्ये जातात. त्यामुळे विद्यार्थांचं शैक्षणीक नुकसान होत असल्याचं निरीक्षण शिक्षण आणि प्रशिक्षण संस्थेच्या अहवालात नोंदवण्यात आलंय.
मुस्लीम अभ्यासकांनी मात्र मदरशांवरील आरोप फेटाळून लावलाय. मदरशांबाबत लोकांची दिशाभूल केली जात असल्याचा दावा मुस्लीम अभ्यासकांनी केलाय. तर या प्रकाराची शालेय शिक्षण विभागाने तातडीनं दखल घेऊन योग्य ती कारवाई करावी अशी मागणी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केलीय.
प्रत्येकाला आपल्या धर्मानुसार शिक्षण घेण्याचा कायदेशीर अधिकार आहे. धार्मिक शिक्षणासोबत किमान 8वी पर्यंत शालेय शिक्षण घेण्याबाबतचाही कायदा आहे. मात्र तरीसुद्धा अनेक मुलं शाळेच्या वेळेत मदरशांमध्ये जात असतील तर हे विद्यार्थी शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात कसे टिकणार? हाच खरा सवाल आहे.