विशाल करोळे, झी मीडिया, औरंगाबाद : लावणी डान्सर गौतमी पाटील (Gautami Patil) हिच्या कार्यक्रमात पुन्हा एकदा धुमाकूळ पहायला मिळाला आहे. औरंगाबाद येथे गौतमीला पाहण्यासाठी चाहत्यांनी तुफान गर्दी केली होती. यावेळी पत्र्याचा शेड तुटून चाहते जखमी झाले आहेत. काही दिवसांपूर्वी पुण्यात गौतमीचा कार्यक्रम सुरु असताना तरुणांची स्टेजसमोर हाणामारी झाली होती.
गौतमी पाटीलचा कार्यक्रम आणि राडा हे आता समीकरणच झालं आहे. गौतमी पाटीलचा डान्स आणि तिची एक झलक पाहण्यासाठी चाहते कोणत्याही धोक्याची पर्वा करत नाहीत. गौतमीचा कार्यक्रम पाहणे काही चाहत्यांना चांगलेच महागात पडले आहे.
औरंगाबाद मधील वैजापूरच्या महालगाव येथे गौतमी पाटीलच्या कार्यक्रमात कार्यक्रम समोरील दुकानाचे पत्र्याचा शेड तुटून लोक खाली पडल्याची घटना घडली आहे. एका दुकानाच्या उद्घाटन प्रसंगी गौतमी आली होती. यावेळी तिला पाहण्यासाठी मोठी गर्दी झाली होती.
जागा मिळेल तिथे लोक उभे राहिले होते. त्यात एका दुकानाच्या पत्र्याच्या शेडवर क्षमतेपेक्षा जास्त लोक उभे राहिले. त्यामुळे कार्यक्रम सुरू असतानाच काही वेळात शेड कोसळले. ही घटना मोबाईल कॅमेऱ्यात चित्रित झाली असून या घटनेत काही लोक जखमी झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.
अहमदनगरच्या श्रीगोंद्यामध्ये गौतमी पाटीलच्या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होते. या कार्यक्रमात गौतमी पाटील मंचावर येतात प्रेक्षकांनी गोंधळ घातला. समोर बसलेले काही प्रेक्षक उभे राहून नाचत असल्याने मागे बसलेल्या प्रेक्षकांना अडचण होऊ लागली. त्यामुळे समोरच्या नाचत असलेल्या प्रेक्षकांना खाली बसवण्यासाठी पोलिसांना सौम्य लाठीमार करावा लागला. यावेळी काही वेळ गोंधळ झाला. पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणल्यानंतर कार्यक्रम पुन्हा सुरू झाला.
'सबसे कातिल गौतमी पाटील' असं तरुणाई सातत्यानं म्हणताना दिसते. गौतमी पाटीलच्या कार्यक्रमांना तुफान गर्दी होते. गौतमीच्या कार्यक्रमात राडा देखील होतो. मात्र आता गौतमी पाटील एका वेगळ्याच कारणानं चर्चेत आलीय. गौतमीचा चक्क एका बैलासमोर नाचतानाचा व्हिडिओ समोर आलाय. बाव-या असं या बैलाचं नाव आहे. बैलगाडा शर्यतीचं प्रतीक म्हणून या बाव-या बैलाला कार्यक्रमस्थळी आणण्यात आलं होतं. या कार्यक्रमात गौतमी पाटील बाव-या बैलासमोर नाचली.