मुंबई : एक्सप्रेस हाताने ढकलून फलाटावर आणणाऱ्या रेल्वे कर्मचाऱ्यांना पश्चिम रेल्वे प्रशासनाने एकूण १० हजार रुपयांचे सामूहिक बक्षिस जाहिर केले आहे. मुंबई सेंट्रल-लखनऊ सुविधा एक्सप्रेस सिग्नल तोडून पुढे गेली होती. एक्सप्रेस हाताने ढकलून पुन्हा फलाटावर आणण्याची रेल्वेच्या इतिहासातील पहिलीच घटना असल्याचे बोलले जात आहे.
मुंबई सेंट्रल फलाट क्रमांक २ वरून गुरुवारी रात्री ७.४५ वाजता सुविधा एक्स्प्रेस रवाना झाली. मात्र लोकोपायलटच्या निष्काळजीपणामुळे ती लोकल सिग्नल बदलासाठी न थांबता थेट पुढे नेली. यामुळे विरार दिशेकडील रुळावर एक्स्प्रेसचे सात डबे गेले. हा डेड-एंड असल्यामुळे येथे ओव्हरहेड यंत्रणा नसल्याने मोठे आव्हान निर्माण झाले.
एक्सप्रेसचे इंजीन सुरू करण्यासाठी ओएचईमधून विद्युत प्रवाह मिळाला नाही. या प्रकारामुळे उपनगरीय रेल्वे सेवांसह लांब पल्ल्यांच्या मेल-एक्स्प्रेसवर देखील परिणाम झाला. यासाठी रेल्वे यंत्रणेकडून अनेक मार्गांनी प्रयत्न केले जात होते पण विरार दिशेकडे डेड-एंड असल्यामुळे पर्यायी इंजीन पाठवणेही शक्य नव्हते.
यावर एक्सप्रेसला धक्का मारुन पुन्हा फलाटावर आणणे हाच पर्याय असल्याचे समोर आले. पण एवढ्या वजनाची रेल्वे ढकलत फलाटावर आणणे हे मोठे आव्हान होते. पण रेल्वे कर्मचारी हमाल आणि अन्य सहकारी अशा ४० जणांनी एक्स्प्रेसला धक्का मारत पुन्हा फलाटावर आणले.
सिग्नल तोडून सुविधा एक्स्प्रेस पुढे नेणाऱ्या लोकोपायलटचा निष्काळजीपणा समोर आला आहे. त्यामूळे लोकोपायलचे तात्काळ निलंबन करण्यात आले असून त्याच्या चौकशीसाठी समिती स्थापन करण्यात आल्याचे रेल्वे प्रशासनाकडून सांगण्यात आले.
मुंबई सेंट्रल-लखनऊ सुविधा एक्स्प्रेसला ढकलणा-या ४० रेल्वे कर्मचा-यांना पश्चिम रेल्वे प्रशासनाने एकूण १० हजारांचे सामूहिक बक्षीस देण्यात येणार आहे. अशा प्रकारची रेल्वेच्या इतिहासातील पहिलीच घटना असल्याचे वरिष्ठ रेल्वे अधिकाऱ्याने सांगतले.