मुंबई : कोरोना विषाणुचा फैलाव होत असला तरी एक दिलासा देणारी बातमी आहे. राज्यात आतापर्यंत १२८२ रुग्ण ठणठणीत बरे झाले आहेत. ते आता घरी गेले आहेत. राज्यात सोमवारी ५२२ नवीन रुग्णांचे निदान करण्यात आले आहे. एकूण रुग्ण संख्या ८५९०पर्यंत पोहोचली आहे, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली. सोमवारी ९४ रुग्णांना घरी सोडण्यात आले असून आतापर्यंत राज्यभरात १२८२ रुग्ण बरे झाले आहेत. तर एकूण ६९३९ रुग्णांवर उपचार सुरु आहे.
सोमवारपर्यंत पाठविण्यात आलेल्या १ लाख २१ हजार ५६२ नमुन्यांपैकी १ लाख १२ हजार ५२ जणांचे प्रयोगशाळा नमुने कोरोना करिता निगेटिव्ह आले आहेत तर ८५९० जण पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात १ लाख ४५ हजार ६७७ लोक होम क्वारंटाईनमध्ये असून ९ हजार ३९९ लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.
राज्यात आज 522 कोरोना बाधीत रुग्णांची वाढ झाली व एकूण संख्या आता 8590 अशी झाली आहे. यापैकी 1282 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन दवाखान्यातून घरी पाठविण्यात आले आहेत.#CoronaVirusUpdates #MeechMazaRakshak #मीचमाझारक्षक #मैंहीमेरारक्षक
— Rajesh Tope (@rajeshtope11) April 27, 2020
राज्यात २७ कोरोना बाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. राज्यात झालेल्या मृत्यूंची संख्या आता ३६९ झाली आहे. सोमवारी झालेल्या मृत्यूपैकी मुंबईचे १५, अमरावती शहरातील ६, पुणे शहरातील ४ तर जळगाव येथील १ आणि औरंगाबाद शहरातील १ आहे. अमरावती शहरात झालेले मृत्यू हे दिनांक २० ते २५ एप्रिल २०२० या कालावधीतील आहेत.
मृत्यूंपैकी १५ पुरुष तर १२ महिला आहेत. सोमवारी झालेल्या २७ मृत्यूपैकी ६० वर्षे किंवा त्यावरील १३ रुग्ण आहेत तर ८ रुग्ण हे वय वर्षे ४० ते ५९ या वयोगटातील आहेत तर ६ रुग्ण ४० वर्षांखालील आहे. या २७ रुग्णांपैकी २२ जणांमध्ये (८१ टक्के) मधुमेह, उच्च रक्तदाब, हृदयरोग, क्षयरोग अशा स्वरुपाचे अतिजोखमीचे आजार आढळले आहेत. यातील एकाला एचआयव्ही आणि आणखी एक रुग्णाला कर्करोग होता, अशी माहिती राज्याच्या आरोग्य विभागाकडून देण्यात आली आहे.