मुंबई : मुंबई महानगरपालिकेतील कर्मचाऱ्यांच्या कामावर येण्या-जाण्याच्या वेळांमध्ये पारदर्शकता येण्यासाठी बायोमेट्रिक पद्धत सुरू करण्यात आली. यानंतर तरी हे कर्मचारी वेळेच पालन करतील अशी आशा होती. सध्या एक वेगळाच प्रकार समोर आलाय. 'ए' विभागातील मरीन ड्राईव्ह परिसरातील काही पालिका कर्मचारी बायोमेट्रिक हजेरी नोंदवून पसार झाल्याचे उघडकीस आलं होतं.
अशाप्रकारे पसार होणाऱ्या आणि कर्तव्यात कसूर करणाऱ्या १४ महापालिका कर्मचाऱ्यांना तात्काळ निलंबित करण्यात आलंय. तसंच या कामगारांशी संबंधित २ पर्यवेक्षक आणि एका सहाय्यक मुख्य पर्यवेक्षकाला 'कारणे दाखवा' नोटीस बजावण्यात आली आहे.
या घटनेच्या पार्श्वभूमीवर सर्व २४ विभागांच्या सहाय्यक आयुक्तांनी आपल्या कार्यक्षेत्रातील परिसरात कर्तव्यावर असणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या कामांची दररोज सकाळी पाहणी करण्याचे आदेश अतिरिक्त महानगरपालिका आयुक्तांनी दिले आहेत. कर्तव्यात कसूर करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर तात्काळ कारवाई करण्यासही आयुक्तांनी सांगितलंय.