मुंबईत चिंता वाढली; धारावीत आणखी २६ जणांना कोरोनाची लागण

धारावीतील अनेक परिसर कन्टेन्मेंट झोन जाहीर करून सील करण्यात आले आहेत. 

Updated: Apr 16, 2020, 05:58 PM IST
मुंबईत चिंता वाढली; धारावीत आणखी २६ जणांना कोरोनाची लागण title=

मुंबई: राज्यातील कोरोनाचा हॉटस्पॉट असलेल्या धारावीत कोरोनाच्या (Coronavirus) रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. यामुळे चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. आज दिवसभरात धारावी परिसरात कोरोनाचे २६ नवे रुग्ण आढळून आले. त्यामुळे आता धारावीतील कोरोनाबाधितांचा एकूण आकडा ८६ इतका झाला आहे. यापैकी ९ रुग्णांचा मृत्यू झाला होता. डॉ. बालिगा नगर, सोशल नगर, मुकुंद नगर या परिसरात कोरोनाचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे धारावीतील अनेक परिसर कन्टेन्मेंट झोन जाहीर करून सील करण्यात आले आहेत.

Corona : लॉकडाऊनने कोरोनाचा पराभव होणार नाही- राहुल गांधी

तर दुसरीकडे वरळी-कोळीवाड्यातील परिस्थिती काहीशी नियंत्रणात येताना दिसत आहे. आजच वरळी कोळीवाड्यातील १२९ हायरिस्क कॉन्टॅक्टमधील रुग्णांना घरी सोडण्यात आले. गेल्या काही दिवसांपासून हे सर्वजण क्वारंटाईनमध्ये होते. या सर्वांच्या कोरोना टेस्ट नेगेटिव्ह आल्या आहेत. मात्र, त्यांना पुढील १४ दिवस घरातच राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. 

लॉकडाऊन-२ : 'राज्यात उद्योग-व्यापार २० एप्रिलपासून सुरु करण्याची तयारी'

लवकरच धारावी परिसरातील नागरिकांच्या रॅपिड टेस्ट केल्या जाणार आहेत. मात्र, त्यासाठी लागणारी किटस् उपलब्ध न झाल्यामुळे अजूनही या टेस्टला सुरुवात झालेली नाही. दरम्यान, आरोग्य मंत्रालयातर्फे गुरुवारी घेण्यात आलेल्या पत्रकारपरिषदेत नागरिकांच्या सरसकट अँटीबॉडी टेस्ट करणे तितकेसे फायदेशीर नसल्याचे सांगण्यात आले. केवळ हॉटस्पॉट असलेल्या परिसरात या टेस्ट फायदेशीर ठरतील, अशी माहिती भारतीय वैद्यक संशोधन परिषदेच्या (IMCR) डॉ. रमण गंगाखेडकर यांनी दिली.