अमित जोशी, झी मिडीया मुंबई : महाराष्ट्रातील भाजपप्रणित देवेंद्र फडणवीस सरकारला आज ३१ ऑक्टोबरला ३ वर्षं पूर्ण होतायत. गेल्या ३ वर्षांत सत्ताधारी भाजपनं नेमका कुठं नेऊन ठेवलाय महाराष्ट्र माझा? पाहूयात हा खास रिपोर्ट....
तब्बल १५ वर्षांनंतर राज्यात सत्ताबदल झाला. काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी सरकारच्या भ्रष्ट कारभाराला कंटाळून जनतेनं महाराष्ट्राची धुरा भाजप आणि मित्रपक्षांच्या सरकारच्या हाती सोपवली.
३१ ऑक्टोबर २०१४ रोजी देवेंद्र फडणवीसांनी मुख्यमंत्र्यांची शपथ घेतली तेव्हा शिवसेना सत्तेत सहभागी नव्हती. रुसवे फुगवे दूर झाल्यानंतर २०१४ च्या डिसेंबरमध्ये शिवसेना सरकारमध्ये सामील झाली. पण अनेक मुद्यांवर शिवसेनेचं वागणं अजूनही विरोधी पक्षात असल्यासारखंच असतं.
शिवसेनेच्या नाही, पण निदान जनतेच्या अपेक्षांवर तरी फडणवीस सरकार खरं उतरलंय का?
सरकारच्या या अपयशी कारभाराविरोधात काँग्रेस-राष्ट्रवादीनं आता कुठं आंदोलनं सुरू केलीत. पण या आंदोलनांमध्येही आक्रमकपणा जाणवत नाहीये. त्यामुळे सरकारसोबत विरोधी पक्षही आपली जबाबदारी पार पाडण्यात अपयशी ठरल्याचं चित्र तूर्तास दिसतंय.