मुंबई : राज्यात सरकारी कर्मचाऱ्यांना शनिवार रविवार सुटी असणार आहे. म्हणजे कामाचे दिवस हे सोमवार ते शुक्रवार असणार आहेत. यात प्राथमिक आणि माध्यमिक शाळा, तसेच महाविद्यालयांचा समावेश नसणार आहे. पण याच निर्णयाप्रमाणे शाळांना देखील रविवारच नाही तर शनिवारी सुटी देऊन, कामकाजासाठी 5 दिवसांचा आठवडा ठेवा, अशी मागणी करण्यात आली आहे.
ही मागणी जनता शिक्षक महासंघाच्या मुंबई-कोकण विभाग अध्यक्षांनी केली आहे. ही मागणी त्यांनी राज्याच्या शालेय शिक्षण विभागाकडे केली आहे.
अध्यक्ष अनिल बोरनार यांनी पाच दिवसाचा आठवडा करण्याची मागणी करताना दिलेल्या माहितीनुसार, माध्यमिक शाळा संहितेनुसार पाच दिवसांचा आठवडा ते करू शकतात. अनेक इंग्रजी शाळांनी शाळांचा आठवडा पाच दिवसाचा केला आहे.
पण अनेक शाळा अजूनही शनिवारी भरत असतात, पण शनिवारी अर्धा दिवस शाळा असते. यावर उपाय सांगताना अनिल बोरनार म्हणतात, शनिवारच्या तासिका सोमवार ते शुक्रवार विभागून देता येतील.
शालेय शिक्षण विभागाने याचा विचार करून पाच दिवसाचा आठवडा करण्यासाठी शासन निर्णय जारी करावा, अशी मागणी त्यांनी केली आहे.