राजमुद्रेचा वापर भोवणार? मनसेला निवडणूक आयोगाची नोटीस

त्या राजमुद्रेचा वापर कुठल्याही पक्षांनी राजकारण करण्यासाठी करू नये, अशी भूमिका संभाजी ब्रिगेडने मांडली होती. 

Updated: Feb 12, 2020, 08:04 PM IST
राजमुद्रेचा वापर भोवणार? मनसेला निवडणूक आयोगाची नोटीस title=

दीपक भातुसे, झी मीडिया, मुंबई: पक्षाच्या झेंड्यावर शिवकालीन राजमुद्रेचा वापर केल्याप्रकरणी बुधवारी निवडणूक आयोगाने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला (मनसे) नोटीस बजावली. मनसेच्या नुकत्याच पार पडलेल्या राज्यव्यापी अधिवेशनात पक्षाच्या नव्या झेंड्याचे अनावरण करण्यात आले होते. हा झेंडा भगव्या रंगाचा असून त्यावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या राजमुद्रेची प्रतिमा आहे. 

त्यामुळे संभाजी ब्रिगेड, मराठा महासंघ आणि जय हो फाऊंडेशनने मनसेच्या या नव्या झेंड्याला विरोध दर्शविला होता. शिवाजी महाराजांनी स्वराज्यासाठी राजमुद्रेची निर्मिती केली. त्या राजमुद्रेचा वापर कुठल्याही पक्षांनी राजकारण करण्यासाठी करू नये, अशी भूमिका संभाजी ब्रिगेडने मांडली होती. 

याविरोधात संभाजी ब्रिगेडने राज्य निवडणूक आयोगाकडे तक्रारही दाखल केली होती. या तक्रारीची दखल घेत निवडणूक आयोगाने मनसेला योग्य ती कार्यवाही करण्याची नोटीस बजावली आहे. 

मात्र, मनसे निवडणूक आयोगाच्या नोटीसला कितपत जुमानेल, याविषीय शंकाच आहे. कारण, मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी या नोटीसविरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे. पक्षाचा झेंडा कुठला असावा याच्याशी राज्य निवडणूक आयोगाचा संबंध नाही. त्यामुळे आम्ही राज्य निवडणूक आयोगाला उत्तर देण्यास बांधील नाही, असा पवित्रा संदीप देशपांडे यांनी घेतला आहे. 

२००६ ला शिवसेनेतून फुटून मनसेचा जन्म झाला, त्यावेळी हिंदूंसाठी भगवा, मुस्लिमांना सामावण्यासाठी हिरवा आणि दलितांचं प्रतिनिधित्व करणारा निळा अशा तिरंगी झेंड्याची निवड मनसेने केली होती. मात्र, राजकारणातील बदलत्या वाऱ्याची दिशा पाहून मनसेने भगवा झेंडा खांद्यावर घेतला आहे. मात्र, भगवा झेंडा हा केवळ पक्षापुरता मर्यादित असेल. निवडणुकीसाठी मनसेकडून पूर्वीचा इंजिन असलेला झेंडाच वापरला जाईल, असे राज ठाकरे यांनी अधिवेशनात स्पष्ट केले होते.