मुंबई : अजित पवार मुंबईतल्या हॉटेल ट्रायडंटला गेले आहेत. अजित पवार आपल्या घरून पोलीस जिमखान्याला जाण्यासाठी निघाले. मात्र मधेच अचानक त्यांनी आपला रस्ता हॉटेल ट्रायडंटकडे वळवला. त्यामुळे अजित पवार हॉटेल ट्रायडंटमध्ये नेमकं कुणाला भेटायला गेले आहेत याबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे.
ट्रायटंड हॉटेलमध्ये काल राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल आणि धनंजय मुंडेही गेले होते, अशी माहिती आहे. त्यामुळे ट्रायटंडमध्ये नेमकी कोण व्यक्ती उपस्थित आहे, ज्यांना भेटायला काल राष्ट्रवादीचे नेते आणि आज अजित पवार गेले आहेत, याबाबत तर्कवितर्कांना उधाण आलं आहे.
अजित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसविरोधात बंड करुन शनिवारी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. अजित पवारांचा हा निर्णय वैयक्तिक असून त्याचा पक्षाशी काहीही संबंध नाही, असं शरद पवारांनी स्पष्ट केलं. तसंच शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीकडे बहुमत आहे, असंही महाविकासआघाडीचे नेते सांगत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसकडून अजित पवार यांचं मन वळवण्याचे प्रयत्न सुरू आहेत.
महाविकासआघाडीने मुंबईतील ग्रॅंड हयात मध्ये 'आम्ही १६२' या सोहळ्याअंतर्गत जोरदार शक्तीप्रदर्शन केले. या कार्यक्रमात १६२ आमदार उपस्थित असल्याचा दावा शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांनी केला. पण भाजपच्या नेत्यांनी हा दावा फेटाळून लावला. तिकडे १४५ आमदार तरी होते का? असा सवाल आशिष शेलार यांनी उपस्थित केला. तर महाविकासआघाडीचे फक्त १३७ आमदारच तिकडे होते, असा गौप्यस्फोट नारायण राणेंनी केला आहे.