Andheri east bypoll : अंधेरी पोटनिवडणुकीची रंगत हळूहळू वाढत चालली आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी ठाकरे गटाच्या उमेदवार ऋतुजा लटके (Rutuja Latke) यांना पाठिंबा देण्याचं आवाहन करणारं पत्र उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांना पाठवल्यानंतर नवा ट्विस्ट आला आहे. दुसरीकडे महाविकास आघाडीच्या उमेदवार ऋतुजा लटकेंच्या विरोधात काँग्रेस (Congress) आक्रमक झाली आहे. अंधेरी पोटनिवडणुकीमध्ये काँग्रेसने उमेदवार न दिल्यामुळे काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी राजीनामा सत्र सुरू केले आहे.
अंधेरी पूर्व मतदारसंघ हा काँग्रेसचा बालेकिल्ला असून याअगोदर दोन वेळेस काँग्रेसचे सुरेश शेट्टी या मतदासंघातून आमदार आणि मंत्री राहिले आहेत. काँग्रेस पक्ष हा कार्यकर्त्यांचे मनोबल कमी करण्याचे काम करत आहे असल्याचं काँग्रेसच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांनी म्हटलं आहे. AICC विश्वबंधुरा यांनी राजीनामा दिला आहे.
अंधेरी पोटनिवडणुकीत ठाकरे गट विरुद्ध भाजप अशी थेट लढत आहे. काँग्रेस, राष्ट्रवादी आणि सीपीएमने ठाकरे गटाच्या उमेदवार ऋतुजा लटके यांना समर्थन दिलं आहे. या निवडणुकीत एकून 14 उमेदवार रिंगणात असून उद्या अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस आहे. त्यामुळे राज ठाकरे यांच्या पत्रानंतर देवेंद्र फडणवीस आणि भाजप काय निर्णय घेतं याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे.
काँग्रेसकडून समर्थन मिळाल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी सोनिया गांधी यांना फोन करुन आभार मानले होते. पण स्थानिक काँग्रेस नेते मात्र काँग्रेसच्या या निर्णयामुळे नाराज असल्याचं पुढे आलं आहे. त्यामुळे काँग्रेसने जरी समर्थन दिलं असलं तरी काँग्रेसचे मतदार कोणाच्या बाजुने मतदान करतील हे निकालातच पुढे येणार आहे.