मुंबई : अंगारकी चतुर्थी निमित्तानं राज्यभरातल्या गणपती मंदिरांमध्ये भाविकांनी आज गर्दी केलीय. मुंबईतल्या प्रभादेवीमधल्या सिद्धिविनायक मंदिरात रात्रीपासूनच भाविकांच्या रांगा लागल्यात. अंगारकी चतुर्थीनिमित्त सिद्धिविनायक मंदिर रात्रभर भाविकांसाठी खुलं करण्यात आले आहे. अंगारकी चतुर्थीनिमित्त आज पुण्यातील श्रीमंत दगडूशेठ गणपती मंदिरात भविकांनी मोठी गर्दी केलीये. भक्तांची गर्दी पाहता मंदिराकडूनही चोख व्यवस्था करण्यात आली आहे.
भाविकांसाठी सिद्धीविनायक ट्रस्ट तर्फे विशेष नियोजन करण्यात आलंय. मंदिरात प्रवेश करण्यासाठी तीन मार्गिका ठेवण्यात आल्यात..यात पुरुषांसाठी रवींद्रनाथ नाट्य मंदिरापासून, महिलांसाठी दत्ता राऊळ मैदानापासून तर गर्भवती महिला, दिव्यांग तसंच ज्येष्ठ नागरिकांसाठी पेट्रोलपंपा समोरील गेटमधून प्रवेश मार्ग उपलब्ध करुन देण्यात आलाय.
रेल्वेनं येणाऱ्या भाविकांना एल्फिन्स्टन आणि दादर रेल्वे स्थानकापासून बेस्टची विनामूल्य सेवा मंदिर ट्रस्ट कडून उपलब्ध करुन देण्यात आली आहे. अंगारकी निमित्त मंदिरात फुलांची सुंदर आरास करण्यात आलीय. तर दुसरीकडे पुण्यात दगडूशेठ हलवाई गणपतीच्या दर्शनासाठीही पुणेकरांनी गर्दी केलीय. अंगारकीनिमित्त मंदिरात आकर्षक सजावट करण्यात आलीय.
दरम्यान, श्रीमंत दगडूशेठ गणपती मंदिरात भाविकांची गर्दी पाहता पहाटे ३ वाजल्यापासूनच मंदिर दर्शनासाठी खुले करण्यात आल आहे. दरम्यान आज पहाटे स्वराभिषेक करण्यात आला. यावेळी गायिका मुग्धा वैशंपायन हिने गायन सादर केलं. आज दिवसभरात मंदिरात गणेश याग होम हवन केलं जणार आहे.