मुंबई : गोरेगाव आरे कॉलनी मृतावस्थेत सापडलेला अथर्व शिंदे यांच्या हत्या प्रकरणाला वेगवेगळे वळण मिळत आहे. 8 मे रोजी घडलेल्या या प्रकाराबाबत पोलिसांकडून कोणताच उलघडा न झाल्यामुळे संशय व्यक्त करण्यात येत आहे. 21 वर्षीय अथर्व हत्या प्रकरणाचा तपास आहे गुन्हा शाखेच्या युनिट 11 कडे सोपविण्यात आला आहे. या प्रकरणात अथर्वच्या आई - वडिलांनी पोलिसांच्या तपासावर प्रश्नचिन्ह निर्माण करून मुंबई पोलीस आयुक्तांना सहा पानाचे पत्र पाठवले आहे.
या पत्रात अथर्वच्या वडिलांनी अनेक गंभीर आरोप केले आहेत. अथर्वचं या पार्टीत रॅगिंग करण्यात आलं असून त्याच्यावर लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक माहिती त्यांनी दिली आहे. तसेच त्या दिवशी पार्टीत उपस्थित असलेल्या 30 तरूणांवर हत्येचा आरोप ठेवून अटक करावी आणि त्यांची लाय डिटेक्ट टेस्ट करावी अशी मागणी देखील त्यांनी या पत्रातून केली आहे.
८ मे रोजी सकाळी सातच्या सुमारास अथर्व या बंगल्यातून बाहेर पळताना दिसतो. त्यावेळी त्याच्या पायात बूट नसल्याचे दिसून येत आहे. त्याचा चष्माही सोबत नसल्याचे दिसून आले. येथून बाहेर पडल्यानंतर त्याने एक रिक्षाचालक तसेच आणखी एकाकडे मोबाइल देण्याची विनंती केली. मात्र, कोणीही त्याला मदत केली नाही. बंगल्याच्या मागील बाजूस बेशुद्धावस्थेत पडलेल्या अथर्वला अनेकांनी पाहिले मात्र, कोणीही त्याला वैद्यकीय मदत देण्यासाठी प्रयत्न केले नाहीत. हे सर्व संशयास्पद असल्याचे शिंदे कुटुंबीयांनी पत्रात म्हटले आहे. त्या दिवशी त्या बंगल्यात काहीतरी घडले आहे, असा त्यांचा आरोप आहे.