Fact Check: महाराष्ट्रात सध्या 36 जिल्हे असून कोकण, पुणे, नाशिक, छत्रपती संभाजीनगर, अमरावती आणि नागपूर अशा विभागात विभागणी केली आहे. मात्र गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर एक यादी फिरत आहे. तसंच, एक मजकूरदेखील फिरत आहे. महाराष्ट्रात पुन्हा 21 नवीन जिल्ह्याची निर्मिती करण्यात येणार असल्याचं यात नमूद करण्यात आलं आहे. या व्हायरल मेसेजमागचे सत्य नेमकं काय आहे? हे जाणून घेण्यामागचा प्रयत्न आम्ही केला आहे. जाणून घेऊया नक्की काय आहे हे प्रकरण?
1 मे 1960 रोजी महाराष्ट्र राज्याची स्थापना झाली. तेव्हा राज्यात 26 जिल्हे होते. मात्र, वाढती लोकसंख्या आणि गरजा लक्षात घेता जिल्ह्यांचे विभाजन करण्यात आले आणि नवीन जिल्ह्यांची भर पडत गेली. तसंच, 2014 मध्ये ठाणे जिल्ह्याचे विभाजन होऊन पालघर हा नवीन जिल्हा तयार करण्यात आला. त्यानंतर पुन्हा एकदा आणखी नवीन जिल्ह्यांचे निर्माण होणार अशी चर्चा सुरू होती.
राज्यात 26 जानेवारी 2025 रोजी नवीन जिल्ह्यांची घोषणा होणार असून राज्यातील 35 जिल्ह्यांपैकी अनेक जिल्ह्यांचे विभाजन होऊन 21 नवीन जिल्ह्यांची निर्मिती प्रस्तावित आहे, अशा आशयाची एक पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. मात्र या वृत्तात तथ्य नसल्याचे समोर आले आहे. राज्य शासन अद्याप असा निर्णय घेतला असल्याचे समोर आले आहे.
सध्या राज्यात शासनाकडून अनेक विविध योजना राबवण्यात येत आहेत. या योजनांसाठी शासन दरबारातून मोठ्या प्रमाणात निधी खर्च होतो. त्यामुळं आत्तातरी नवीन जिल्ह्यांच्या प्रस्तावावर कोणताही निर्णय घेण्यात आलेला नाही. नवीन जिल्ह्याची निर्मिती करण्यासाठी मोठ्या प्रमाणात खर्च येतो. नवीन जिल्हाधिकारी कार्यालय असो किंवा जिल्हा न्यायालयाच्या उभारणीसाठी मोठ्या प्रमाणात खर्च येण्याची शक्यता आहे. सध्या शासनाची इतक्या मोठ्या प्रमाणात खर्च करण्याची तयारी नसल्याने अद्याप तरी नवीन जिल्ह्यांचा निर्णय घेण्यात येणार नसल्याचे, जाणकारांचे म्हणणे आहे.
Fact Check सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या या पोस्टमध्ये काहीही तथ्य नसल्याचे समोर आले आहे. शासन स्तरावरून अशी कोणतीही घोषणा अथवा निर्णय झालेला नसून राज्यात काही नवीन जिल्हे प्रस्तावित असून त्याबाबतची माहिती विकीपिडीयावर अनेक वर्षांपासून दिलेली आहे. त्यातून ही माहिती उचलून फेक पोस्ट बनवण्यात आली आहे.