Today in History : मालुसरे कुटुंबाच्या नवरदेवाच्या गळ्यात का घातली जाते कवड्याची माळ?; थेट छत्रपती शिवाजी महाराजांशी संबंध

355 वर्षांपूर्वी छत्रपती शिवरायांनी अर्पण केली 364 कवड्यांची माळ; मालुसरे कुटुंबासाठी आजही तितकीच महत्त्वाची 

दक्षता ठसाळे-घोसाळकर | Updated: Feb 17, 2025, 11:39 AM IST
Today in History : मालुसरे कुटुंबाच्या नवरदेवाच्या गळ्यात का घातली जाते कवड्याची माळ?; थेट छत्रपती शिवाजी महाराजांशी संबंध  title=

छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापन केलं. या स्वराज्यात त्यांना अनेक शिलेदारांची साथ मिळाली त्यातीलच एक शिलेदार म्हणजे सुभेदार वीर तानाजी मालुसरे. कोंढाणा येथे मुघलांशी झुंज देत तानाजी मालुसरे यांच्यासह मराठा मावळ्यांनी गड हातील घेतला पण या युद्धात तानाजी मालुसरे यांना मात्र वीरगती प्राप्त झाली. 

शिवरायांना ही बातमी कळताच,'गड आला, पण सिंह गेला' असे शब्द महाराजांच्या तोंडून बाहेर पडले. याच कोंढाणा किल्ल्याचे नाव बदलून महाराजांनी 'सिंहगड' ठेवले. आजचाच तो दिवस म्हणजे 17 फेब्रुवारी रोजी ज्या दिवशी सिंहगड मुघलांच्या तावडीतून मराठ्यांना सोडवला. Today In History मध्ये आपण सिंहगड, तानाजी मालुसरे आणि 364 कवड्यांची माळ याबाबत जाणून घेणार आहोत. 

कवड्यांची राजमाळ

छत्रपती शिवाजी महाराजांनी सुभेदार तानाजी मालुसरे यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या स्मृतीला 364 कवड्यांची राजमाळ अर्पण केली. 355 वर्षांपूर्वी अर्पण केलेली ही कवड्यांची माळ आजही इतिहासीच साक्ष देत आहे. रायबाचे लग्न बाजूला ठेवून सुभेदार मालुसरे कोंढाण्याच्या मोहिमेला गेले होते. तानाजी मालुसरे यांनी मुघलांशी झुंज देत कोंढाणा म्हणजे आताचा सिंहगड राखला. पण यामध्ये तान्हाजी मालुसरे यांना वीरगती प्राप्त झाली. 

उमरठ गावी मालुसरे वाड्यात काही दिवसांनी दुःखाच्या सावटा खाली रायबांचे लग्न पार पडले. या लग्नाला छत्रपती शिवाजी महाराज आणि राजमाता आवर्जून उपस्थित होते. महाराजांनी तानाजींच्या पार्थिवावर अर्पण केलेली कवड्यांची माळ यावेळी रायबा यांनी गळ्यात घातली होती. 

रायबा यावेळी महाराजांचा आशिर्वाद घेण्यासाठी आले. यावेळी छत्रपतींनी रायबांच्या हातात सोन्याचे तोडे हातात घातले आणि रायबांना म्हणाले की, तुमच्या गळ्यात असलेली कवड्यांची माळ ही तानाजींची आठवण आहे. या कवड्यांच्या माळेत स्वराज्याचा विजय आहे. महाराजांनी मालुसरेंच्या स्मृतीला अर्पण केलेली ही कवड्यांची राजमाळ वंशजांकडे आहे. रायबा मालुसरे यांनी ही राजमाळ लग्नात गळ्यात घातली होती. तेव्हापासून आजपर्यंत ही राजमाळ लग्नसोहळ्यात नवरदेवाच्या गळ्यात घालण्याची पद्धत आहे. ही परंपरा आजही मालुसरे घराण्याने जतन केली आहे. 

सुभेदार तानाजी मालुसरे यांचे थेट वंशज कै. शिवराज बाळकृष्ण मालुसरे यांच्या पाठीमागे त्यांची पत्नी शितल शिवराज मालुसरे हा वारसा जपत आहे. यांच्याबरोबर मुलगा रायबा आणि कन्या अंकिता-देवयानी असा परिवार महाड येथे राहतात. या कुटुंबाने कवड्यांची राजमाळ अजूनही जतन केली आहे.