बोरीवलीवरून थेट CSMT गाठता येणार; पश्चिम रेल्वेच्या महत्त्वाच्या प्रकल्पासंदर्भात मोठी अपडेट

Mumbai Local Train Update: बोरीवलीकरांना आता थेट सीएसएमटीपर्यंत विना अडथळा पोहोचता येणार आहे. पश्चिम रेल्वेच्या हार्बर विस्तारासाठी भूसंपादन सुरू आहे.   

मानसी क्षीरसागर | Updated: Feb 17, 2025, 11:20 AM IST
बोरीवलीवरून थेट CSMT गाठता येणार; पश्चिम रेल्वेच्या महत्त्वाच्या प्रकल्पासंदर्भात मोठी अपडेट title=
Mumbai Local Train Update Goregaon-Borivli harbour line project underway

Mumbai Local Train Update: मुंबई लोकल ही मुंबईकरांची लाइफलाइन आहे. लाखो लोक लोकलने प्रवास करतात. उपनगरातून मुंबईत येण्यासाठी नागरिकांना खूपच उलटा प्रवास करावा लागतो. नागरिकांचा प्रवास अधिक आरामदायी व्हावा यासाठी रेल्वेने काही उपाययोजना हाती घेतल्या आहेत. हार्बर मार्गावरुन मुंबई उपनगरात पोहोचणे सुलभ व्हावे म्हणून पश्चिम रेल्वेकडून एका प्रकल्पावर काम सुरू आहे. पश्चिम रेल्वेच्या हार्बर विस्तारासाठी भूसंपादन सुरू आहे. 

पश्चिम रेल्वेच्या हार्बर मार्गाचा गोरेगाव ते बोरीवली दरम्यान विस्तार करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. त्यासाठी बोरीवलीतील ३०९४ चौ. मीटर जमीन रेल्वेला आवश्यक आहे. तिच्या भूसंपादनाची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. गोरेगाव आणि बोरीवली दरम्यान मार्गिकेचा विस्तार करण्यासाठी ८९४.१६ कोटी रुपये खर्च येणार आहे. या प्रकल्पाचे काम मुंबई अर्बन ट्रान्सपोर्ट प्रोजेक्ट ३ अ (एमयूटीपी) अंतर्गत करण्यात येत आहे. प्रकल्पाच्या भूसंपादनामध्ये अनेक आव्हाने आहेत. त्यात ७६८ प्रकल्प बाधितांच्या पुनर्वसनाचा प्रश्न आहे.

गोरेगाव ते बोरीवली दरम्यान ५२० प्रकल्पबाधितांचे सर्वेक्षण पूर्ण झाले आहे. पात्र बाधितांना पर्यायी घरे देण्यासाठी सर्वेक्षण अहवाल एमएमआरडीएकडे सादर करण्यात आला आहे. ही संपूर्ण जमीन खासगी असून तिच्या संपादनाचे काम जिल्हाधिकाऱ्यांमार्फत सुरू करण्यात आले आहे. 

पश्चिम रेल्वेने हार्बर मार्गाचा विस्तार दोन टप्प्यात करण्याचा निर्णय घेतला आहे. सध्या गोरेगावपर्यंत हार्बर मार्ग आहे. पुढे हाच मार्ग बोरीवलीपर्यंत नेण्यात येणार आहे. गोरेगाव ते मालाड आणि मालाड ते बोरीवली असा दोन टप्प्यात हा प्रकल्प पूर्ण करण्यात येणार आहे. सध्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते गोरेगाव व पनवेल ते गोरेगाव असा मार्ग सुरू आहे. 

गोरेगाव ते मालाड पहिला टप्पा 2026-27 आणि मालाड ते बोरीवली दुसरा टप्पा 2027-28 पर्यंत पूर्ण होण्याची शक्यता आहे. या विस्तारामुळं सीएसएमटी ते बोरिवली अशी थेट लोकलसेवा उपलब्ध होणार आहे. त्यामुळं बोरीवलीकरांना आता थेट लोकल पकडणे शक्य होणार आहे. 

पश्चिम रेल्वे झाली वक्तशीर

पश्चिम रेल्वेच्या मुंबई विभागाच्या वक्तशीरपणामध्ये सुधारणा झाली आहे. एप्रिल २०२४ पासून फेब्रुवारी २०२५ या कालावधीत पश्चिम रेल्वेचा एकूण वक्तशीरपणामध्ये ५ टक्क्यांची वाढ झाली असून, तो ८२ टक्क्यांवरून आता ८७टक्क्यांवर पोहोचला आहे. पश्चिम रेल्वेने चालू आर्थिक वर्षात वक्तशीरपणा ९० टक्क्यांपर्यंत नेण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. यासाठी तांत्रिक सुधारणा, आधुनिकीकरण, मनुष्यबळाचे कार्यक्षम व्यवस्थापन आणि यंत्रणांची नियमित देखभाल यावर भर दिला जाणार आहे.