Mumbai Crime News: मुंबईतील कुर्ला येथे एक धक्कादायक घटना घडली आहे. जन्मदात्या वडिलांनीच चिमुकल्या मुलीची हत्या केली आहे. कौटुंबीक वादातूनच त्याने आपल्या पोटच्या पोरीचे आयुष्य संपवलं. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. पोलिसांनी नराधम बापाला अटक केली असून त्याच्या विरोधात हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
परवेज सिद्दीकी वय 33 असं आरोपीचे नाव आहे. कुर्लातील विनोबा भावे नगर परिसरातील एलआयजी कॉलनीत तो राहत होता. जोडप्यांमध्ये सातत्याने वाद होत होते. सिद्दीकी हा बेरोजगार असल्यामुळं दोघांमध्ये सतत भांडण होत होते. त्याच भांडणातून चिमुरड्या मुलीचा नाहक बळी गेला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी ही घटना घडली असून दोघा नवरा-बायकोमध्ये झालेल्या वादानंतर सिद्दीकीने रागात पत्नीला मारहाण केली. इतकंच नव्हे तर तिच्या हातात असलेल्या तीन महिन्यांच्या चिमुकल्या मुलीला हिसकावून घेतलं आणि जमिनीवर आपटले. यातच त्या चिमुरडीचा मृत्यू झाला आहे.
सिद्दीकी एकत्र कुटुंबात राहत होता. त्याचे आई-वडील, दोन लहान भाऊ, त्याची पत्नी आणि तीन मुली असा त्याचा परिवार होता. धाकटी मुलगी तीन महिन्यांची, एक पाच वर्षांची आणि एक दोन वर्षांची मुलगी आहे. तर सिद्दीकीचा भाऊ फार्मा कंपनीत कामाला आहे. सिद्दीकी हा बेरोगजार असून तो पूर्णपणे कुटुंबावर अवलंबून होता.
ज्यावेळी घटना घडली तेव्हा सिद्दीकीची पत्नी मोठ्या मुलीला बेडरुममध्ये जेवण भरवत होती. मात्र तिने जेवण्यास नकार दिल्याने पत्नीने तिला चापट मारली. हे पाहून सिद्दीकीला राग आला आणि त्याने पत्नीला मारहाण केली. तसंच, रागाच्या भरात त्याने धाकट्या मुलीला तिच्या हातातून खेचून घेतलं आणि जमिनीवर आपटलं.
या घटनेनंतर आरोपी घटनास्थळावरुन पळून गेला. त्यानंतर कुटुंबीयांनी चिमुकलीला भाभा रुग्णालयात दाखल केले. मात्र तोपर्यंत तिचा मृत्यू झाला होता. सिद्दीकीच्या पत्नीने दाखल केलेल्या तक्रारीनंतर आरोपीला ताब्यात घेण्यात आलं आहे.