मुंबई इंडियन्सचं टेन्शन वाढवणारी बातमी; 4.80 कोटींना विकत घेतलेल्या खेळाडूची माघार! आता...

IPL 2025 Big News For Mumbai Indians: मुंबई इंडियन्स आणि मुंबई इंडियन्सच्या चाहत्यांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. विशेष म्हणजे वेळापत्रक जाहीर होताच ही माहिती समोर आलीये.

स्वप्निल घंगाळे | Updated: Feb 17, 2025, 09:10 AM IST
मुंबई इंडियन्सचं टेन्शन वाढवणारी बातमी; 4.80 कोटींना विकत घेतलेल्या खेळाडूची माघार! आता... title=
मुंबई इंडियन्सला मोठा धक्का

IPL 2025 Big News For Mumbai Indians: मुंबई इंडियन्सच्या संघाला इंडियन प्रिमिअर लीग 2025 च्या वेळपत्रकाराची घोषणा झाल्याच्या दिवशीच मोठा धक्का बसला आहे. मुंबई इंडियन्सच्या संघातील अफगाणिस्तानचा अल्लाह गजनफर यंदाच्या पर्वात खेळणार नसल्याचं स्पष्ट झालं आहे. त्याच्या जागी संघाने मुझबीर-उल-रेहमानला संधी दिली आहे. 

कोण आहे हा नवा खेळाडू?

मुझबीर-उल-रेहमान हा उजव्या हाताने गोलंदाजी करणारा ऑफ स्पीनर आहे. त्याने आयपीएलमध्ये 19 सामने खेळले असून त्याच्या नावावर 19 विकेट्स आहेत. त्याला 2 कोटी रुपये देऊन मुंबईच्या संघाने करारबद्ध केलं आहे. "मुझबीर-उल-रेहमान हा अफगाणिस्तानसाठी क्रिकेट खेळेलेल्या सर्वात तरुण खेळाडूंपैकी एक आहे. त्याने आपल्या गोलंदाजीने अनेकांना इतकं आश्चर्यचकित केलं आहे की तो अल्पावधीत लोकप्रिय झाला असून वयाच्या 17 वर्षी त्याला मुंबई इंडियन्सच्या संघात स्थान मिळालं आहे," असं मुंबईने जारी केलेल्या पत्रकात म्हटलं आहे.

330 हून अधिक विकेट्स

"मुझबीर-उल-रेहमानने 300 हून अधिक टी-20 सामने (अंतरराष्ट्रीय आणि स्थानिक स्तरावरील) खेळला असून त्याच्या नावावर 330 हून अधिक विकेट्स आहेत. त्याने 6.5 च्या सरासरीने विकेट्स घेतल्या आहेत. गजनफरला लवकर बरं वाटावं अशी मुंबईच्या संघाची प्रार्थना आहे," असंही संघाने जारी केलेल्या पत्रकात म्हटलं आहे.

नक्की वाचा >> IPL 2025 चं वेळापत्रक जाहीर! 'या' संघांमध्ये होणार पहिली मॅच, पाहा संपूर्ण शेड्युल

चॅम्पियन्स ट्रॉफीमधूनही माघार

अफगाणिस्तानचा हरहुन्नरी ऑफ स्पीनर असलेल्या अल्लाह गजनफरने आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी पाठोपाठ आयपीएलमधूनही माघार घेतली आहे. अल्लाह गजनफरच्या पाठीला फ्रॅक्चर झालं आहे. त्यामुळे पुढील चार महिने त्याला क्रिकेट खेळता येणार नाहीये, असं अफगाणिस्तान क्रिकेट बोर्डाने स्पष्ट केलं आहे.

अफगाणिस्तान क्रिकेट बोर्डाने काय सांगितलं?

"अल्लाह गजनफर हा आयसीसीच्या चॅम्पियन्स ट्रॉफीमधून बाहेर पडला आहे. त्याच्या पाठीचा एल फोर व्हर्टीब्रा तुटला आहे," असं अफगाणिस्तान क्रिकेट बोर्डाने सांगितलं आहे. सध्या झिम्बाब्वेच्या दौऱ्यावर असताना त्याला ही दुखापत झाली असून तो चार महिने मैदानापासून दूर राहणार आहे. तो या कालावधीमध्ये उपचार घेणार आहे," असं अफगाणिस्तान क्रिकेटने बोर्डाने स्पष्ट केलं आहे.

4.8 कोटी रुपयांची बोली लावलेली

आयपीएल 21 मार्च ते 25 मे दरम्यान खेळवलं जाणार आहे. अल्लाह गजनफरला मुंबई इंडियन्सच्या संघाने तब्बल 4.8 कोटी रुपयांची बोली लावून संघात स्थान दिलं होतं. मात्र आता तो या स्पर्धेत खेळताना दिसणार नाही.