Maharashtra Weather News : फेब्रुवारी महिन्याचा पंधरवडा उलटून गेल्यानंतरही राज्यात सुरु असणारी तापमानवाढ कायम असल्यानं आता हवामान विभागानंही नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. राज्याच्या बहुतांश जिल्ह्यांमध्ये तापमानाचा आकडा 35 अंशांपलिकडे गेला असून, पहाटेच्या वेळी काही ठिकाणी असणारा गारठा वगळला तर दिवसभर जाणवणाऱ्या उष्णतेच्या झळा येत्या दिवसांत आणखी तीव्र होणार असल्याचा इशारा देण्यात आला आहे.
महाराष्ट्रात सध्या कोकण किनारपट्टी भागासह अंतर्गत क्षेत्रातही तापमानवाढीमध्ये सातत्य पाहायला मिळत असून, कमाल आणि किमान तापमानाचा आकडा 15 ते 23 अंशांनी विभिन्न असल्याचं स्परष्ट होत आहे. पुढील 48 तास ही स्थिती कायम राहणार असून, विदर्भासह मध्य महाराष्ट्रातही 2 ते 3 अंशांची तापमानवाढ अपेक्षित असल्याचं सांगण्यात येत आहे.
सध्या मुंबईचं कमाल तापमान 36 अंश सेल्सिअसवर पोहोचलं असून, मार्च ते मे या तीन महिन्यांत मुंबईकरांची आणखी होरपळ होणार असल्याचा इशारा देण्यात आला आहे. मुंबई शहर आणि उपनगरांमध्ये तापमानात वाढ होत असून काँक्रिटीकरणामुळे उष्णतेत कमाल वाढ होताना दिसत आहे.
फक्त महाराष्ट्रच नव्हे, तर संपूर्ण देशभरातही हवामानात सातत्यपूर्ण बदल होत असून, उत्तरेकडील राज्यांमध्ये सकाळी आणि रात्री उशिरानं तापनात घट झाल्याचं लक्षात येत आहे. तर, सूर्य माथ्यावर आल्यानंतर मात्र तापमानात भयंकर वाढ पाहायला मिळत आहे. केंद्रीय हवामानशास्त्र विभागाच्या माहितीनुसार उत्तर प्रदेशामध्ये पावसाचं सावट असून, जम्मू काश्मीर, लडाख, उत्तराखंड, हिमाचल प्रदेश इथंही पावसाच्या हलक्या सरींसह हिमवृष्टीचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. 17 फेब्रुवारी ते 22 फेब्रुवारीदरम्यान हवामानाची ही स्थिती कायम राहणार आहे.
आयएमडीच्या इशाऱ्यानुसार राजस्थान आणि मध्य प्रदेशावर वादळी पावसाचं सावट असून 17 ते 19 फेब्रुवारीदरम्यान सक्रिय असणाऱ्या पश्चिमी झंझावातामुळं ही स्थिती कायम राहणार आहे. तर, पुढे 19 ते 20 फेब्रुवारीदरम्यान पंजाब आणि हरियाणामध्ये हलक्या पावसाची शक्यता आहे.