मराठा आरक्षणावरुन श्रेयवादाची लढाई

मराठा समाजाच्या मतांवर डोळा?

Updated: Aug 2, 2018, 11:10 AM IST
मराठा आरक्षणावरुन श्रेयवादाची लढाई title=

मुंबई : राज्यातील सर्वच पक्ष मराठा आरक्षणाच्या मागणीची पाठराखण करताना दिसत आहेत. यामागे मराठा समाजाची सहानुभूती मिळवणं हे कारण आहेच. याशिवाय श्रेयवादाची लढाईसुद्धा यामागे दडली आहे. त्यामुळेच काँग्रेस आणि राष्ट्रवादीनं, मराठा आरक्षणावर एकाच दिवशी वेगवेगळी बैठक घेतली. तर दुसरीकडे शिवसेना-भाजपामध्येही मराठा आरक्षणावरून श्रेयासाठी हा प्रयत्न झाल्याचं पहायला मिळाला. 

सकल मराठा समाजाच्या वतीने मराठा आरक्षण आणि इतर काही मागण्यांसाठी मराठा मुक क्रांती मोर्चा काढण्यात आले. आतापर्यंत राज्यात शांततेत आणि अहिंसात्मक मार्गाने लाखोंचे मोर्चे निघाले. पण भाजप सरकारने वेळकाढूपणा केल्याने मराठा समाज आक्रमक झाला आणि आंदोलनाला सुरुवात झाली. काही ठिकाणी आंदोलनाला हिंसक वळण देखील लागलं.

आतापर्यंत मराठा आरक्षणासाठी कन्नडचे शिवसेना आमदार हर्षवर्धन जाधव, राष्ट्रवादीचे भाऊसाहेब चिकटगावकर, शिवसेनेचे हेमंत पाटील, राहुल मोटे आणि काँग्रेसचे भारत भालके यांनी आमदारकीचे राजीनामे दिले आहेत. लवकरच राज्यात आणि देशात निवडणुका होणार आहेत. याच पार्श्वभूमीवर मराठा समाजाच्या मतांवर अनेक राजकीय पक्षांचा डोळा आहे. त्यामुळे आता मराठा समाज कोणाच्य़ा बाजुने उभा राहतो हे येणाऱ्या काळातच कळणार आहे.