मुंबई : पीएमसी बँकेत खातं असणाऱ्यांना रिजर्व्ह बँक ऑफ इंडियाकडून मोठा दिलासा मिळाला आहे. ज्याअंतर्गत खातेदारांना खात्यातून पैसे काढण्याची मर्यादा ५० हजार रुपयांपर्यंत वाढवण्यात आली आहे. यापूर्वी खातेदारांना ४० हजार रुपयांपर्यंतची रक्कम काढण्याची मुभा रिझर्व्ह बँकेनं दिली होती.
आरबीआयकडून घेण्यात आलेल्या या नव्या निर्णयानंतर आता पीएमसी बँकेच्या जवळपास ७८ टक्के खातेधारकांना त्यांच्या खात्यातून संपूर्ण रक्कम काढून घेता येणं शक्य होणार आहे. २३ ऑक्टोबरला आरबीआयनं पीएमसीवर निर्बंध आणल्यानंतर एकूण ९ ठेवीदारांचा या धसक्यानं मृत्यू झाला होता. सर्व खातेदारांच्या ठेवी शंभर टक्के सुरक्षित असल्याचं भाजपा नेते किरीट सोमय्या यांनी म्हटलंही. पण, तरीही खातेदारांमध्ये असणारं निराशेचं आणि भीतीचं वातावरण मात्र कायम होतं.
गेल्या काही दिवसांपासून पीएमसी बँकेतील घोटाळ्यामुळे अनेक सर्वसामान्य ठेवीदाराच्या जीवनावर याचे थेट परिणाम झाल्याचं पाहायला मिळालं. पीएमसी बँकेत मोठा गैरव्यवहार झाल्याचं उघड होताच रिझर्व्ह बँकेने पीएमसीवर काही आर्थिक निर्बंध लादले होते. परिणामी, पीएमसीला रिझव्र्ह बँकेच्या परवानगीशिवाय कर्ज वितरणाला, नवीन गुंतवणूक करण्याला किंवा निधी मिळवून दायित्व वाढविता येण्याला परवानगी नव्हती. शिवाय नव्याने ठेवी स्वीकारण्याला, तसेच ठेव वठविणं, देणी देणं आणि आपल्या कोणत्याही स्थावर मालमत्ता आणि संपत्तीची विक्री, हस्तांतरण किंवा अन्य मार्गाने विल्हेवाटीवर बंदी आणणं यावरही बंदी आणली होती.
बँकेतील या घोटाळ्यानंतर आपल्याला न्याय मिळावा यासाठी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामण मुंबईत आल्या असताना संतप्त खातेधारकांनी त्यांच्यासमोर निदर्शनेही केली होती. त्यावेळी या समस्येवर तोडगा काढण्याचं आश्वासन सीतारामण पीएमसी खातेधारकांना दिलं होतं.