Maharashtra Political Crisis : महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षात वेगवान घडामोडी घडत आहेत. शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांच्या गटात अपक्षांसह 50 आमदार आहेत. त्यामुळे महाविकास आघाडीकडे संख्याबळ नसल्याचा दावा एकनाथ शिंदे गटाकडून केला जाणार आहे. तसं पत्र एकनाथ शिंदे आज राज्यपालांना पाठवण्याची शक्यता आहे.
यासंदर्भात शिंदे गट कायदेतज्ज्ञांशी चर्चा करणार असून गटस्थापनेबाबत कायदेशीर बाजू तपासणीचं काम सुरु आहे.
महाराष्ट्रात सत्ता स्थापनेंच गणित
महाराष्ट्रात सत्ता स्थापनेसाठी 144 हा स्पष्ट बहुमताचा आकडा आहे. शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांचे समर्थक 50 आमदार आणि भाजपचे समर्थक 114 आमदार असे मिळुन 164 आमदारांचे बहुमत विधान सभेत सिद्ध करून राज्यात भाजप+शिवसेना ( शिंदे गट ) असं सरकार स्थापन करण्यासाठी राजकीय घडामोडी सुरू झाल्यात.
आणखी आणदार फोडण्याची रणनिती
शिवसेनेचे आणखी आमदार आणि खासदार फोडण्यासाठी एकनाथ शिंदेंनी नवी रणनीती आखलीये. त्यासाठी एकनाथ शिंदेंनी 5 आमदारांचा एक गट तयार केलाय. हा गट शिवसेना आमदार आणि खासदारांशी सतत संपर्क साधतोय. जे आमदार, खासदार गळाला लागतात त्यांना थेट गुवाहाटीला बोलावण्यात येतंय. केवळ आमदार खासदारच नव्हे तर आता एकनाथ शिंदेंनी सेनेच्या पदाधिकाऱ्यांशीही संपर्क सुरु केल्याची माहिती सूत्रांनी दिलीये. पदाधिकारीही सोबत आल्यास शिवसेनंचं निवडणूक चिन्ह धनुष्यबाणही ताब्यात येईल अशी शिंदेंची रणनीती आहे..
शिंदे गटाला उपमख्यमंत्रीपदाची ऑफर
एकनाथ शिंदे यांच्याकडे शिवसेना आमदार, खासदारांचं संख्याबळ वाढत असतानाच आता भाजपने शिंदे गटाला उपमुख्यमंत्रीपदाची ऑफर दिल्याची माहिती आहे. विशेष म्हणजे फडणवीस आणि अजित पवार यांनी 2019 मध्ये स्थापन केलेल्या 80 तासांच्या सरकारमध्ये अजित पवारांना असलेली ऑफरच शिंदेंना भाजपने दिल्याची माहिती समोर येत आहे.
उपमुख्यमंत्रीपदासह 12 मंत्रिपदं शिंदे गटाला मिळतील अशी शक्यता आहे. शिंदे गटाला मंत्रिमंडळाच्या एकूण क्षमतेच्या 25 टक्के खाती मिळण्याची शक्यता आहे. शिंदेंसह 10 जणांना मंत्रिमंडळात स्थान मिळेल अशी शक्यता आहे. सध्याच्या मंत्रिमंडळातल्या 6 मंत्र्यांचा शिंदे गटाला पाठिंबा आहे. त्या सहाही मंत्र्यांना नवा सरकारच्या मंत्रिमंडळात स्थान मिळेल अशी शक्यता आहे.
चिन्हासाठी कायदेशीर लढाई
शिवसेनेचा 'धनुष्यबाण' मिळवण्यासाठी शिंदे हे कायदेशीर लढाई लढवतील अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. शिंदे यांच्यासोबत सध्या 40 च्या वर आमदारांची संख्या आहे. हे सगळं सुरु असताना 'मूळ पक्ष' म्हणून दर्जा मिळवण्याचेही एकनाथ शिंदे यांच्याकडून प्रयत्न सुरु करण्यात आले असल्याची माहिती समोर आली आहे.
शिवसेनेचा 'धनुष्यबाण' मिळवण्यासाठी शिंदे हे कायदेशीर लढाई लढवतील अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. शिवसेनेचे दोन तृतीयांश आमदार शिंदेंच्या गोटात असल्याची माहिती समोर येत आहे. 'मूळ पक्ष' म्हणून दर्जा मिळवण्याचेही एकनाथ शिंदेंचे प्रयत्न आहेत, अशी माहिती आहे. यासाठी भाजपची टीम मदत करत असल्याची देखील माहिती आहे. आपला गट हीच खरी शिवसेना असा दावा एकनाथ शिंदे विधानसभा उपाध्यक्षांना पत्र पाठवून करणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. पत्र सादर केल्यानंतर शिंदे सत्तास्थापनेचा दावा करतील अशी माहिती मिळतेय.