मुंबई : राज्यांतर्गत प्रवासावरील निर्बंध काढून टाका अशी मागणी भाजपा प्रदेश उपाध्यक्ष माधव भांडारी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे केली आहे. या बाबत भांडारी यांनी मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, कोरोना विषाणूचा प्रसार थांबण्यासाठी अनेक अशा उपाययोजना राबवण्यात आलेल्या.
त्याअंतर्गतच राज्यातंर्गत प्रवासावरही बंदी घातलेली. मात्र या काळात संपूर्ण अर्थचक्र थांबल्याने समाजातील सर्वच वर्गाला आर्थिक फटका बसलेला. आता परिस्थिती हळूहळू सावरत असताना केंद्र सरकारने आर्थिक व्यवहार पूर्वपदावर येण्यासाठी राज्यातंर्गत प्रवासावरील बंदी हटवण्याच्या सूचना दिलेल्या असूनही राज्य सरकारने याची अंमलबजावणी अजूनही केलेली नाही. राज्यांतर्गत प्रवास बंदी, ई पास या अटीमुळे जनतेला त्रास सहन करावा लागत आहे.
या निवेदनांमध्ये केंद्र सरकारच्या सूचनेनुसार राज्यातंर्गत प्रवासावरील निर्बंध ताबडतोब उठवावेत, ई पास पूर्णपणे बंद करावा, स्थानिक प्रशासनाला याबाबतीत दिलेले अधिकार काढून घ्यावेत, राज्यातील शेतकरी व छोटे उद्योजक यांचे व्यवहार सुरू करण्यासाठी मदतीच्या योजना राबवाव्यात व ते नीट चालावेत यासाठी भ्रष्टाचार रोखण्याला प्राधान्य द्यावे अशा चार प्रमुख मागण्या श्री. भांडारी यांनी केल्या आहेत.