भाजप मेगाभरती : चंद्रकांत पाटील 'त्यांना' काढून चूक सुधारा - नवाब मलिक

भाजपची मेगाभरती ही चूक असल्याचे वक्तव्य  चंद्रकांत पाटील यांनी केल्यानंतर आता राष्ट्रवादीने भाजपला टोला लगावला आहे. 

Updated: Jan 18, 2020, 01:19 PM IST
भाजप मेगाभरती : चंद्रकांत पाटील 'त्यांना' काढून चूक सुधारा -  नवाब मलिक  title=

मुंबई : भाजपची मेगाभरती ही चूक असल्याचे वक्तव्य प्रदेश अध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केल्यानंतर आता राष्ट्रवादीने भाजपला टोला लगावला आहे. तर शिवसेनेकडूनही हल्लाबोल करण्यात आलाय. शिवसेनेने म्हटले आहे, हे उशिरा सुचलेले शाहणपण आहे. तर राष्ट्रवादीने ज्यांना पक्षात स्थान दिले आहे. त्यांना बाहेरचा रस्ता दाखवा आणि आपली चूक सुधारा, असा सल्ला दिला आहे. तुमची चूक झाली असेल तर ती सुधारा आणि जे आमदार, खासदार झाले आहेत आणि नेते आयात केले त्याना पक्षातून काढून चूक सुधारण्याचा प्रयत्न करा, असा सल्ला राष्ट्रवादीचे प्रवक्ते आणि मंत्री नवाब मलिक यांनी दिला आहे. 

भाजपने निवडणुकीच्या काळात जी दुसऱ्या पक्षातून आलेल्यांसाठी 'मेगाभरती' केली, ही चूकच होती, असे धक्कादायक वक्तव्य भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केले. त्यांनी हे वक्तव्य करुन माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना जोरदार टोला लगावला आहे. चंद्रकांत पाटील यांनी पिंपरी-चिंचवडमधील भाजप मेळाव्यात हे वक्तव्य केले होते. या वक्तव्यावर आता पक्षातून आणि विरोधी पक्षातून तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत. या विधानानंतर चंद्रकांत पाटील यांनी थेट देवेंद्र फडणवीस यांच्या धोरणांवरच बोट ठेवल्याचे म्हटले जात आहे. मेगाभरती ही भाजपची सर्वात मोठी चूक असून यामुळे भाजपच्या मुळ संस्कृतीला धक्का बसल्याचे चंद्रकांत पाटील म्हणालेत. यावर राष्ट्रवादीकडूनही जोरदार हल्लाबोल करताना सल्लाही दिला आहे.

त्यांना पक्षातून काढून टाका - शिवसेना 

चंद्रकांत पाटील यांनी केलेले विधान गांभीर्याने घेणे गरजेचे आहे. भाजपने पक्षवाढीसाठी हौशे-नौशे-गौशे घेतले आणि ज्यांना समाजाने फेकून इतर राजकीय पक्षांनी ज्यांना काढून टाकले होते, अशा लोकांना भाजपने आपल्या पक्षात घेतल्यामुळे जे निष्ठावान कार्यकर्ते होते. एकनाथ खडसे, बावनकुळे याना निवडणुकीपासून दूर ठेवले गेले. त्याचा परिणाम भाजपला भेगावा लागला आहे. चंद्रकांत पाटील यांना हे उशिरा सूचले, हे जर अगोदर सूचले असते तर बरे झाले असते. इतर आले त्यांचे चोचले पुरवण्यासाठी निष्ठावान लोकांवर अन्याय केला गेला. निष्ठावान लोकांना या भरतीमुळे डावले गेले, अशी प्रतिक्रिया शिवसेना खासदार विनायक राऊत यांनी दिली.

काँग्रेस, राष्ट्रवादीला खिंडार पाडून या पक्षातील अनेक दिग्गज नेत्यांना भाजपने लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या आधी आपल्या पक्षात प्रवेश दिला. यावेळी या बाहेरील नेत्यांचं स्वागत करताना पक्षाच्या पहिल्या फळीतील नेत्यांमध्ये उत्साह होता. भाजपकडून वारंवार सांगितले जात होते. नावालाही विरोधी पक्ष सापडणार नाही. आमचीच सत्ता येणार आहे. त्यामुळे सगळे लोक आमच्याकडे येत आहेत. तेथे त्यांना काम नसल्याने ते आमच्यासोबत विकासासाठी येत असल्याचा दावा भाजपकडून करण्यात येत होता. मात्र, ज्यांना पक्षात घेऊन त्यांना उमेदवारी देऊनही ते पराभूत झालेत. तसेच निवडणुकीनंतर वेगळेच चित्र दिसून आले. भाजपला विरोधी पक्षात बसावे लागले आहे. त्यानंतर भाजपमध्ये अंतर्गत कुरबुरी वाढल्याचे दिसून येत आहे.