मुंबई : यंदाही मुंबई मॅरेथॅानवर परवानगीची टांगती तलवार राहणार आहे. मागील थकबाकी भरा, त्यानंतरच परवानगी मिळेल असं स्पष्ट धोरण मुंबई महापालिकेने अवलंबलं आहे.
मागील वर्षीही जाहिरात शुल्क, जमीन वापर शुल्क भरण्याच्या मुद्यावरून मुंबई मॅरेथॉन वादात सापडली होती. मुंबई मॅरेथॉन स्पर्धेसाठी जागेचा वापर, लेझर शो, होतात. त्यासाठी जाहिरात शुल्क, भू-वापर शुल्क आणि सुरक्षा ठेव अशी रक्कम पालिकेकडून आकारली जाते. मागील वर्षी सुमारे 5 कोटी 48 लाख रुपये भरणे बंधनकारक होते. तसे पत्रही महापालिकेच्या संबंधित विभागानं आयोजकांना दिलं होतं. मात्र आयोजकांनी 23 लाख रुपये भरून त्यावेळी परवानगी घेतली होती.
यंदा येत्या २१ जानेवारीला मुंबई मॅरेथॉन आयोजित केली आहे. यासाठी आयोजक असलेल्या प्रोकॅम इंटरनॅशनल प्रायव्हेट लिमिटेडनं बीएमसीकडे परवानगी मागितली आहे. गेल्या वर्षीच्या मॅरेथॉनचे 21 हजार 400 रुपयांचे जाहिरात शुल्क आणि 2 कोटी 74 लाख रूपये ग्राउंड चार्जेसचेपोटी आधी द्यावेत, त्यानंतरच पुढील परवानगीचा विचार करणार असल्याचे बीएमसीनं पत्राद्वारे आयोजकांना कळवलं आहे.