मुंबई: लोअर परळ परिसरातील डिलाईल रोड ओव्हर ब्रिज धोकादायक घोषित केल्यानंतर मंगळवारी पालिकेचे कर्मचारी अचानकपणे करीरोडच्या ब्रिटीशकालीन पुलावर कारवाई करण्यासाठी धडकले. मात्र, या कारवाईमागे वेगळेच लागेबांधे असल्याचे सांगत स्थानिकांनी हा पूल तोडण्यास मनाई केली. स्थानिकांच्या विरोधानंतर तुर्तास पालिकेच्या अधिकाऱ्यांनी ही कारवाई थांबवली आहे.
मध्य रेल्वेच्या करी रोड स्थानकालगत असणारा ब्रिटिशकालीन करी रोड पुलाचा एक भाग धोकादायक आहे, असे सांगत पालिकेच्या कर्मचाऱ्यांनी अचानक तोडण्यास सुरुवात केली. करी रोड पूर्वेकडे उतरणाऱ्या पुलाचा कोपरा १० फुटापर्यंत तोडण्यात येणार होता.
मात्र, स्थानिकांनी याला आक्षेप घेतला. धोकादायक असेल तर संपूर्ण पूल तोडा. परंतु, कुठलीही सूचना न देता एक कोपरा का तोडताय, असा सवाल स्थानिकांनी पालिका अधिकाऱ्यांना विचारला.
या पुलालगत टोलेजंग इमारतीचे बांधकाम सुरु आहे. या इमारतीमध्ये जाण्यासाठी प्रवेशाचा मार्ग सुकर व्हावा, यासाठीच अचानकपणे पुलाचा कोपरा तोडला जात असल्याचा आरोप स्थानिकांनी केला आहे. त्यानंतर ही कारवाई तुर्तास स्थगित करण्यात आली.