मुंबई : Coronavirus कोरोना व्हायरसमुळे अत्यंक आव्हानात्मक परिस्थिती उदभवलेली असतानाच केंद्रापासून ते राज्यापर्यंत सर्वत्र प्रशासनही सर्वतोपरी प्रयत्न करत या संकटाशी दोन हात करताना दिसत आहे. देशातील सर्वाधिक कोरोना रुग्ण असणाऱ्या महाराष्ट्रातही हेच चित्र आहे. राज्यात सुरु असणाऱ्या लॉकडाऊनच्या चौथ्या टप्प्यामध्ये राज्य शासनाने काही नियम शिथिल केले आहेत.
नियमांमध्ये शिथिलता आणलेली असली तरीही रेड आणि कंटेन्मेंट झोनमध्ये मात्र काही कठोर नियमांची अंमलबजावणी केली जाण्याचे आदेशही राज्या सरकारने दिले आहेत. यामध्येच कोरोना परिस्थितीत येणाऱ्या अडचणी आणि समस्यांच्या अनुषंगाने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी चित्रपट निर्माते, नाट्य निर्माते, कलाकार, दूरचित्रवाणी वाहिन्यांचे निर्माते यांच्याशी व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे चर्चा केली.
बुधवारी ठाकरे यांनी या मंडळींशी संवाद साधता. तत्पूर्वी मुंबईतील विविध वृत्तपत्र वितरकांशीदेखील त्यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे संवाद साधला होता.
मुख्यमंत्र्यांशी संवाद साधणाऱ्या व्यक्तींमध्ये सुबोध भावे, आदेश बांदेकर, निखिल साने, नितीन वैद्य, अतुल परचुरे, अवधूत गुप्ते, मंगेश कुलकर्णी, रवी जाधव, विजू माने, राहुल देशपांडे, अजय भालवणकर, मुक्ता बर्वे, केदार शिंदे, सुकन्या मोने, पुष्कर श्रोत्री, हेमंत ढोमे, प्रशांत दामले, सुभाष नकाशे, प्रसाद महाडकर, शरद पोंक्षे असे कलाविश्वातील प्रसिद्ध चेहरे पाहायला मिळाले.
मुख्यमंत्री आणि कलाविश्वातील या मंडळीमध्ये नेमकी काय चर्चा झाली आणि त्याचा या संकटसमयी राज्याला, नागरिकांना कसा फायदा होणार आहे हे पाहणं महत्त्वाचं असेल. शिवाय चित्रपट आणि नाट्य वर्तुळाची एकंदर व्याप्ती पाहता या क्षेत्राबाबत काही महत्त्वाचे निर्णय घेतले जातात का याकडेही साऱ्यांचं लक्ष असेल.