मुंबई : राज्यात नव्याने स्थापन झालेल्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सरकारमध्ये पहिल्याच दिवशी कुरबुरींना सुरूवात झाल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. काँग्रेस उपमुख्यमंत्रीपदासाठी आग्रही आहे. विधानसभा अध्यक्षपदाऐवजी उपमुख्यमंत्रीपद मिळावे, अशी काँग्रेसची मागणी असल्याचे आता पुढे आले आहे. दरम्यान, राष्ट्रवादीते उपमुख्यमंत्री कोणाला द्यावे, यावरुन तिढा झाल्याचे काल दिसून येत होते. त्यामुळे उपमुख्यमंत्री पद कोणाला द्यावे, याचा निर्णय काल राष्ट्रवादीत झाला नव्हता. मात्र, आता काँग्रेसने दावा केल्याने नवा पेच निर्माण झाला आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसने उपमुख्यमंत्रीपद न घेता विधानसभा अध्यक्षपद घ्यावे, अशी काँग्रेसच्या नेत्यांची राष्ट्रवादी काँग्रेसकडे मागणी केल्याचे सांगण्यात येत आहे. एखादे महत्त्वाचं खाते कमी मिळाले तरी चालेल पण उपमुख्यमंत्रीपद काँग्रेसला मिळायला हवे, असा काँग्रेसचा आग्रह असल्याचे समजते आहे. सत्तेत समान मान मिळावा यासाठी काँग्रेसचा आग्रह आहे, असे समजते आहे.