मुंबई: भाजपच्या 'महाराष्ट्र बचाव' आंदोलनानंतर सध्या सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये वाकयुद्ध सुरु आहे. भाजपने आपल्या आंदोलनात 'मेरा आंगण, मेरा रणांगण' या कॅचलाईनचा वापर केला होता. हाच धागा पकडत राज्याचे महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी भाजप नेत्यांना टोला लगावला. भाजप नेत्यांनी कायम राज्यपालांच्या अंगणात जाण्यापेक्षा कधीतरी स्वत:च्या अंगणात (मतदारसंघात) जाऊन जनतेला मदत करावी, असे थोरात यांनी म्हटले. चंद्रकांत दादांचे आंगण नेमके कोणते? देवेंद्र फडणवीस तरी आपल्या अंगणात नागपूरला गेले का? त्यांच्या अंगणात काँग्रेस कार्यकर्तेच मदतकार्य करत आहे, असा टोलाही यावेळी थोरात यांनी लगावला.
'फडणवीस दिल्लीतील नेत्यांच्या संपर्कात, राज्यात अस्थिरता पसरवण्याचा कट'
कोरोनाच्या संकटकाळात राजकारण करायचे नाही. केंद्र व राज्य सरकारने एकमेकांच्या सहकार्याने काम करायचे, या पंतप्रधान मोदी यांच्या आवाहनाला काँग्रेससह अन्य विरोधी पक्षांनी साथ दिली. पण मोदी यांच्या पक्षाचेच नेते राज्यात त्यांच्या आवाहनाला बगल देत आहेत. सत्ता गेल्यामुळे राज्यातील भाजपचे नेते वैफल्यग्रस्त झाले असून, सत्तेसाठी त्यांची तडफड चालली आहे, असे थोरात यांनी म्हटले.
चंद्रकांत दादांचे आंगण नेमके कोणते? देवेंद्र फडणवीस तरी आपल्या अंगणात नागपूरला गेले का? त्यांच्या अंगणात काँग्रेस कार्यकर्तेच मदतकार्य करत आहे. कायम राज्यपालांच्या आंगणात जाण्यापेक्षा भाजप नेत्यांनी स्वतःच्या अंगणात जाऊन जनतेला मदत करावी!#महाराष्ट्रद्रोहीBJP
— Balasaheb Thorat (@bb_thorat) May 22, 2020
काही दिवसांपूर्वी बाळासाहेब थोरात यांनी फडणवीसांसह काही भाजप नेते महाराष्ट्र सरकार अस्थिर करण्यासाठी कट आखत असल्याचा आरोप केला होता. देवेंद्र फडणवीस यांच्यासह दिल्ली आणि राज्यातील काही नेते सातत्याने सरकार अडचणीत कसे येईल, हे पाहत आहेत. सरकार अस्थिर करण्यासाठी त्यांचे प्रयत्न सुरु आहेत. आज राज्यावर संकट आले असताना त्याला सामोरे जायचे सोडून भाजप राजकारण करु पाहत आहे. भाजपची कृती ही महाराष्ट्रद्रोही असल्याचेही त्यांनी म्हटले होते.