मुंबई : देशात कोरोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होताना दिसत आहे. राजभवनापासून ते बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांच्या बंगल्यापर्यंत कोरोना पोहोचला आहे. अशा सुरक्षित ठिकाणी देखील कोरोना व्हायरसचा शिरकाव झाल्यामुळे आता तरी UGCला पटेल का? असा प्रश्न उपस्थित करत उच्चशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी चिंता व्यक्त करत भाजपला टोला लगावला आहे. कोरोना काळात देखील अंतिम वर्षाच्या परीक्षा घेण्यावरून वाद निर्माण झाला होता.
वाद निर्माण झाला असला तरी राज्य सरकार मात्र परीक्षा न घेण्याच्या त्यांच्या निर्णयावर ठाम आहे. 'राजभवनात कोरोना पोहोचला आहे. अमिताभ बच्चन देखील कोरोनाच्या विळख्यात सापडले आहेत.' अशा सर्व कठीण परिस्थितीत परीक्षा घेणं योग्य आहे का? असा प्रश्न उदय सामंत यांनी ट्विटरच्या माध्यमातून उपस्थित केला आहे.
राजभवनात कोरोना ..अमिताभजींना कोरोना .. अश्या सुरक्षित ठिकाणी कोरोना पोहचू शकला .. आत्ता तरी HRD आणि UGC ला पटेल का.. की परीक्षा घेणं म्हणजे माझ्या विध्यार्थ्यांच्या आयुष्याशी खेळणं आहे.. आत्ता तरी भूषण पटवर्धन महाराष्ट्राची बाजू मांडतील का ???
— Uday Samant (@samant_uday) July 12, 2020
'अशा सर्व परिस्थितीत परीक्षा घेणं म्हणजे विद्यार्थांच्या आयुष्याशी खेळणं आहे. त्यामुळे आता तरी भूषण पटवर्धन महाराष्ट्राची बाजू मांडतील का?' असा थेट सवाल उदय सामंत यांनी उपस्थितीत केला आहे.
दरम्यान, राजभवनातील तब्बल १०० लोकांची कोरोना चाचणी करण्यात आली आहे. त्यापैकी १६ जणांना कोरोनाची लागण झाल्याची बाब समोर येत आहे तर इतरांचे रिपोर्ट अद्याप आलेले नाहीत. त्यामुळे राजभवनात सध्या चिंताजनक वातावरण आहे. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची प्रकृती स्थिर असल्याचं समजत आहे.
सर्वप्रथम राजभवनातील इलेक्ट्रिशियनला कोरोनाची लागण झाली. त्यानंतर राजभवनातील १०० कर्मचाऱ्यांची कोरोना चाचणी करण्यात आली. हे सर्व कर्मचारी राजभवर परिसरातील क्वॉर्टर्समध्ये राहतात.