दाऊद पाकिस्तानातच... 'भाई'च्या भाईचा गौप्यस्फोट!

भारताचा सर्वात मोठा शत्रू दाऊद इब्राहीम पाकिस्तानातच आहे... आयबीने इक्बाल कासकरच्या केलेल्या चौकशीत ही माहिती समोर आलीय. सूत्रांच्या माहितीनुसार इक्बाल कासकरने चौकशी दरम्यान आयबीच्या अधिकाऱ्यांना दाऊद इब्राहीम पाकिस्तानातच असल्याचं सांगितलंय.  

Updated: Sep 22, 2017, 01:10 PM IST
दाऊद पाकिस्तानातच... 'भाई'च्या भाईचा गौप्यस्फोट! title=

मुंबई : भारताचा सर्वात मोठा शत्रू दाऊद इब्राहीम पाकिस्तानातच आहे... आयबीने इक्बाल कासकरच्या केलेल्या चौकशीत ही माहिती समोर आलीय. सूत्रांच्या माहितीनुसार इक्बाल कासकरने चौकशी दरम्यान आयबीच्या अधिकाऱ्यांना दाऊद इब्राहीम पाकिस्तानातच असल्याचं सांगितलंय.  

इक्बालनं दिला दाऊदचा पत्ता

भारताच्या विविध एजन्सीजनी आंतरराष्ट्रीय स्तरावर हा दावा केलाय की दाऊद इब्राहीम पाकिस्तानात लपलाय. भारताने या संबंधीचे पुरावेही वारंवार सादर केलेत. मात्र आता खुद्द दाऊदचा भाऊ इक्बाल कासकरने भारताच्या या दाव्यांवर मोहोर उमटवलीय. सध्या ठाणे पोलिसांनी खंडणीखोरीच्या गुन्ह्याखाली इक्बाल कासकरच्या मुसक्या आवळल्या आहेत. इक्बालची चौकशी करण्यासाठी आयबीची टीम ठाण्यात दाखल झाल्याची माहिती झी २४ तासने सर्वप्रथम दाखवली होती. आयबीच्या अधिकाऱ्यांनी ६ ते ७ तास केलेल्या कसून चौकशीत इक्बालने दाऊदचा पाकिस्तानातला पत्ताच सांगितला.

पाकिस्तानातच लपलाय दाऊद  

मोदी सरकार सत्तेत आल्यावर दाऊद प्रचंड घाबरल्याच्या बातम्या वारंवार येत असतात. एका ठिकाणी दाऊद एक वर्षापेक्षा जास्त काळ थांबतही नाही अशी सूत्रांची माहिती आहे. गेल्या तीन वर्षात त्याने चार वेळा आपली ठिकाणं बदलली आहेत. एवढंच नाही तर गुप्तहेरांचा ससेमीरा सोडवण्यासाठी भारतातल्या नातेवाईकांशी बोलत नाही. इक्बाल कासकरनेही पोलिसांनी नेमकी हीच माहिती दिली... गेल्या काही वर्षात त्याचं दाऊदशी बोलणं झालं नाही पण इक्बाल अजूनही अनिस इब्राहीमशी संपर्कात आहे.  

ड्रग्जचा धंदा जोरात

सध्या ड्रग्जच्या धंद्या दाऊदने मोठी गुंतवणूक केलीय अशी माहिती इक्बाल कासकरने दिलीय. लॅटीन अमेरिका आणि आफ्रिकी देशात दाऊद आपलं नेटवर्क वाढवत आहे. तिथल्या स्थानिक अंमली पदार्थ तस्करांशी दाऊदने हात मिळवल्याची माहिती आहे. अफगाणिस्तानसोबत पाकिस्तानचे संबंध बिघडल्यावर दाऊदने आपला होरा आफ्रिकी देशांकडे वळवला आहे.  

इक्बाल कासकरने दाऊदबाबत दिलेली ही माहिती केवळ भारतासाठी नाही तर अमेरिकेसह जगभरातल्या सुरक्षा एजन्सीजसाठी महत्त्वपूर्ण आहे. दहशतवादाबाबत पाकिस्तानवर दबाव निर्माण कऱण्याबाबत ही माहिती फारच महत्त्वाची आहे.

आता पाकिस्तान कुठे तोंड लपवणार?

दाऊद इब्राहीम पाकिस्तानातच असल्याची माहिती भारतासाठी नवी नाही. भारताने दाऊद पाकिस्तानातच असल्याचे पुरावेही वारंवार दिलेत. पाकिस्तानने हे दावे अनेक वेळा फेटाळले. मात्र आता इक्बालच्या या गौप्यस्फोटानंतरही पाकिस्तानने हे दावे फेटाळले तर मात्र आश्चर्याची गोष्ट असेल... 

 
ठाणे पोलिसांसह आयबीनेही आता इक्बालची कसून चौकशीला सुरूवात केलीय. खंडणीखोरीबाबत ठाणे पोलीस तपास करत आहेतच. त्यात ठाण्यातले काही राजकीय नेते मंडळी अडकण्याची शक्यता वर्तवली जात आहे. काही नगरसेवकांचीही चौकशी होणार असल्याची शक्यता आहे. मात्र त्याही पेक्षा महत्त्वाचं म्हणजे भारताचा नंबर एकचा शत्रू असलेल्या दाऊदबाबतही इक्बालकडून महत्त्वाची माहिती घेतली जात आहे. त्यामुळे इक्बालच्या अटकेतून अनेक पक्षी मारले जाणार आहेत.