Sourav Ganguly Car Accident : सौरव गांगुलीच्या कारचा अपघात; लॉरीनं धडक दिली अन्...

Sourav Ganguly Car Accident : एकिकडे भारतीय क्रिकेट संघाच्या चॅम्पियन्स ट्रॉफीतील कामगिरीची चर्चा असतानाच दुसरीकडे संघाचा माजी कर्णधार सौरव गांगुली याच्या कारचा अपघात झाल्याची बातमी समोर आली आहे.

सायली पाटील | Updated: Feb 21, 2025, 07:11 AM IST
Sourav Ganguly Car Accident : सौरव गांगुलीच्या कारचा अपघात; लॉरीनं धडक दिली अन्...
Sourav Ganguly Car Accident In Bengal On Durgapur Highway Got Hit By A Lorry On Road Indian cricket team news

Sourav Ganguly Car Accident : चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये पहिल्याच सामन्यात विजयी सलामी देत भारतीय क्रिकेट संघानं धडाकेबाज सुरुवात केली आणि क्रिकेटप्रेमींचा आनंद द्विगुणित झाला. पण, या आनंदाला गालबोट लागलं ते एका चिंता वाढवणाऱ्या बातमीनं. भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार आणि BCCI चा माजी अध्यक्ष सौरव गांगुली याच्या कारला दुर्गापूर एक्स्प्रेसवे इथं भीषण अपघात झाला. दंतनपूर इथं हा अपघात झाल्याची माहिती समोर आली आहे.

अपघातामध्ये गांगुलीच्या कारला काही प्रमाणात नुकसान झालं असल्याचं वृत्त समोर आलं आहे. सूत्रांच्या माहितीनुसार एका कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी म्हणून गांगुली बर्दावानच्या दिशेनं निघाला होता. राज्यातील इतर भागांप्रमाणंच दंतनपूर इथंही पावसाला सुरुवात झाली होती. याचदरम्यान गांगुलीची रेंज रोव्ह नियंत्रित वेगानं रस्त्यावरून जात असतानाच समोरून आलेल्या लॉरीनं त्याच्या कारला धडक दिली आणि वाहनावरील नियंत्रण सुटलं.

कारचालकानं तातडीनं समयसूचकता बाळगत पुन्हा वाहनावर नियंत्रण मिळवलं आणि ब्रेक मारला, ज्यामुळं मागे असणारी सर्व वाहनं एकामागून एक एकमेकांवर आदळली. गांगुलीच्या कारच्या मागे असणाऱ्या वाहनाचीही त्याच्या कारला धडक बसली. पण, यामध्ये सुदैवानं कोणालाही गंभीर इजा झाल्याची नोंद नाही. अपघातानंतर गांगुलीनं परिस्थिती नियंत्रणात येईपर्यं रस्त्याच्या बाजूला उभं राहून काही वेळ प्रतीक्षा केली आणि काही वेळानं तो आयोजित कार्यक्रमासाठी निघून गेला. सौरव गांगुलीला या अपघातात कोणतीही इजा झाली नसून, तो सुखरुप असल्याचं वृत्त समोर आलं आहे.