Yuzvendra Chahal and Dhanashree Varma Divorced: भारतीय क्रिकेट टीमचे स्टार फलंदाज युजवेंद्र चहल आणि त्याची पत्नी धनश्री वर्मा यांचा घटस्फोट झाला आहे. वांद्रे येथील कौटुंबिक न्यायालयात गुरुवारी त्यांच्या घटस्फोटाची प्रक्रिया पार पडली आहे. गेल्या कित्येक दिवसांपासून चहल आणि धनश्री यांच्या घटस्फोटाच्या चर्चांना उधाण आले होते अखेर या चर्चेवर शिक्कामोर्तब झाले आहे.
रिपोर्टनुसार, कोर्टातील एका वकिलांनी दिलेल्या माहितीनुसार, घटस्फोटाची अंतिम सुनावणी आणि काही औपचारिक बाबी झाल्यानंतर धनश्री आणि चहल दोघंही सकाळी 11 वाजण्याच्या सुमारास फॅमिली कोर्टात पोहोचले होते. त्यानंतर न्यायाधीशांनी दोघांना समुपदेशकांकडे पाठवलं होतं. येथे 45 मिनिटेदोघांचेही काउन्सलिंग केले गेले.
वकिलांनी दिलेल्या माहितींनुसार, धनश्री आणि युजवेंद्र यांना न्यायाधीशांनी विचारलेल्या प्रश्नांचे उत्तर देताना म्हटलं होतं की, दोघांच्याही सहमतीने घटस्फोट घेत आहोत. तर, अन्य एका प्रश्नावर उत्तर देताना म्हटलं की, दोघंही 18 महिन्यांपासून एकमेकांपासून वेगळे राहत आहेत. सहमतीने घटस्फोट घेत असताना जोडप्याने कमीत कमी एक वर्षांपर्यंत वेगळे राहणे गरजेचे असते.
घटस्फोटाच्या सुनावणीदरम्यान कोर्टाने दोघांनाही विभक्त होण्याचे कारण विचारले. तेव्हा त्यांनी एकमेकांसोबत जुळवून घेता येत नाहीये आणि कम्पॅटबिलीटीचा मुद्दा असल्याचे दोघांनी सांगितले आहे. त्यानंतर न्यायाधीशांनी चर्चा केल्यानंतर दोघांच्याही घटस्फोटावर कोर्टाने मुहोर उमटवली आहे. कायदेशीररित्या दोघही आता पती-पत्नी नसणार आहेत. कोर्टाने संध्याकाळी 4.30 च्या सुमारास हा निर्णय दिला आहे.
धनश्री आणि चहल दोघांचेही चार वर्षांपूर्वी लग्न झाले होते. दोघांचाही प्रेम विवाह होता. गेल्या काही दिवसांपासून दोघांत काहीतरी बिनसल्याची चर्चा होती. दोघांनी इन्स्टाग्रामवरुन एकमेकांना अनफॉलोदेखील केले होते तसंच फोटोदेखील डिलीट केले होते. त्यामुळं दोघ घटस्फोट घेणार असल्याची चर्चा जोर धरू लागली होती. मात्र यावर धनश्री आणि चहल दोघांकडून कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया आली नाहीये.