शिमगो इलो रे! कोकणात जाण्यासाठी स्पेशल ट्रेन सोडणार, 'या' तारखेपासून तिकीट बुक करा

Holi Special Train For Konkan: होळीच्या दिवशी कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांची गर्दी असते. त्यामुळं रेल्वे तिकीट आरक्षित करण्यासाठी लगबग सुरू आहे.  

मानसी क्षीरसागर | Updated: Feb 21, 2025, 07:43 AM IST
शिमगो इलो रे! कोकणात जाण्यासाठी स्पेशल ट्रेन सोडणार, 'या' तारखेपासून तिकीट बुक करा
Holi 2025 Running of Special Trains during Holi Festival for kokan

Holi Special Train For Konkan: होळी हा सण महाराष्ट्रात मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. शिमग्यानिमित्त मोठ्या संख्येने चाकरमानी कोकणात जातात. त्यामुळं रेल्वेलादेखील मोठी गर्दी असते अशावेळी कोकणात जाण्यासाठी रेल्वेचे रिझर्व्हेशन काही महिने आधीच केले जाते. प्रवाशांची ही अडचण लक्षात घेऊनच होळीनिमित्त कोकणासाठी विशेष रेल्वेगाड्या सोडण्यात येणार आहेत. 

कोकणात जाणाऱ्यांची संख्या लक्षात घेऊन मध्य व कोकण रेल्वे मार्गावरून विशेष रेल्वेगाड्या चालवण्याचे नियोजन केले आहे. होळीनिमित्त मध्य रेल्वे आणि कोकण रेल्वेच्या समन्वयाने सीएसएमटी – मडगाव, एलटीटी – मडगाव अशा रेल्वेगाड्या चालवण्यात येणार आहेत. कोकण रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार, गाडी क्रमांक ०११५१ सीएसएमटी – मडगाव विशेष रेल्वेगाडी सीएसएमटीवरून ६ मार्च, १३ मार्च रोजी मध्यरात्री १२.२० वाजता सोडण्यात येणार आहे. ही रेल्वेगाडी अनुक्रमे ७, १४ मार्च रोजी दुपारी १.३० वाजता मडगाव येथे पोहोचेल. गाडी क्रमांक ०११५२ मडगाव – सीएसएमटी विशेष रेल्वेगाडी मडगाव येथून ६ मार्च, १३ मार्च रोजी दुपारी २.१५ वाजता सोडण्यात येणार असून ही रेल्वेगाडी त्याच दिवशी मध्यरात्री ३.४५ वाजता सीएसएमटीला पोहोचेल.

गाडी क्रमांक ०११२९ लोकमान्य टिळक टर्मिनस – मडगाव १३ मार्च, २० मार्च रोजी लोकमान्य टिळक टर्मिनस येथून रात्री १०.१५ वाजता सुटेल. ही रेल्वे अनुक्रमे १४ मार्च आणि २१ मार्च रोजी दुपारी १२.४५ वाजता मडगाव येथे पोहोचेल. गाडी क्रमांक ०११३० मडगाव- लोकमान्य टिळक टर्मिनस विशेष रेल्वेगाडी १४ मार्च, २१ मार्च रोजी मडगाव येथून दुपारी १.४० वाजता सुटेल. ही रेल्वेगाडी २२ मार्च रोजी पहाटे ४.०५ वाजता लोकमान्य टिळक टर्मिनस येथे पोहोचेल.

तिकीट आरक्षण २४ फेब्रुवारीपासून

या रेल्वेगाड्यांचे तिकीट आरक्षण २४ फेब्रुवारी रोजी सर्व संगणकीकृत आरक्षण केंद्रांवर आणि आयआरसीटीसी या संकेतस्थळावर सुरू होईल, अशी माहिती कोकण रेल्वेने दिली.