Little Girl question to Devendra Fadnavis Video : सर्वत्र गणेशोत्सवाची धूम आहे, असून सेलिब्रिटींसह राजकीय नेत्यांकडेही बाप्पाचं आगमन झालं आहे. अशात सेलिब्रिटी असो किंवा राजकीय नेते एकमेकांच्या घरी बाप्पाच्या दर्शनासाठी जात आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या घरी जाऊन बाप्पाचं दर्शन घेतलं. त्यानंतर ते ठाण्यातील आमदार निरंजन डावखरे यांच्या घरी गेले. तिथे एका चिमुकलीने त्यांना राजकारणातील इतके प्रश्न विचारले की त्यांना सळो की पळो करुन सोडले. (devendra fadnavis visit niranjan davkhare ganpati darshan eight year old girl annada Saket Dambre political question to dcm fadnavis video viral)
आठ वर्षांच्या या चिमुकलीने पहिला प्रश्न देवेंद्र यांना विचारला की, जपानला जाऊन आमच्या दीदीसाठी काय गिफ्ट आणलं? तिने हा प्रश्न विचारल्यावर फडणवीस यांना हसू आवरलं नाही. या चिमुकलीने गोड आवाज एका मागोमाग अनेक प्रश्न वाचून देवेंद्र फडणवीस यांची विकेट घेतली. एवढंच नाही तर राज्यात केलेली चांगलं कामं आम्हाला लक्षात राहतात, असंही ती न घाबरता बोलली.
ती देवेंद्र फडणवीस यांना म्हणाली, नरेंद्र मोदी हे आपले पंतप्रधान आहे. आम्हाला झोपूनही उठवलं तरी पंतप्रधान कोण असं विचारल्यावर आम्ही सांगू शकतो. त्यानंतर ती चिमुकली म्हणते उपमुख्यमंत्री म्हणून आम्ही तुमचं नाव पाठ केलं होतं आणि आता उपमुख्यमंत्री अजित पवार पण आहेत. आरक्षण, मेट्रोसारखे प्रश्न तुम्ही हसत हसत सोडवता. पण आम्हा लहान मुलांकडेही लक्ष द्या. जेणे करुन आम्हाला एकच मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांची नावं पाच वर्ष पाठ राहिल.
एवढ्या लहान मुलीन पंतप्रधान मोदींपासून ते ठाकरे, शिंदे यांच्यापर्यंत तिच्या मनातील भावना बोलून दाखवल्या त्या ऐकून फडणवीसांनी सुद्धा तिला चांगलीच दाद दिली. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल ही चिमुकली आहे तरी कोण? या 8 वर्षांच्या चिमुकलीचं नाव अन्नदा संकेत डामरे असं आहे. ही कल्याणला राहते आणि तिथल्या सेक्रेड हार्ट शाळेत तिसऱ्या वर्गात शिकते.
लहानपणापासूनच अन्नदा ही हरहुन्नरी असून राजकीय समाजिक प्रश्नांची तिला चांगलीच जाण आहे. मागच्या वर्षी ती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे याना भेटली होती. तेव्हाही तिने मला गुवाहाटीला घेऊन जाल का म्हणत मुख्यमंत्र्यांना कोंडीत पकडलं होत.
अन्नदा ही निरंजन डावखरे यांच्या मित्राची मुलगी आहे. ती वडिलांसोबत डावखरे यांच्याकडे गणरायाच्या दर्शनसाठी आली होती. त्यावेळी तिथे देवेंद्र फडणवीस आले आणि तिने प्रश्नांचा भडीमार केला.