मुंबई : जोगेश्वरी विक्रोळी लिंक रोड येथील वाहतूक कोंडीचा फटका परिक्षार्थींना बसला आहे. न्यू इंडिया इंश्यूरन्सची परीक्षा देण्यासाठी राज्यभरातील तरुण पवई येथे आले होते पण जोगेश्वरी विक्रोळी लिंक रोड येथे असलेल्या नेहमीच्या वाहतूक कोंडीला त्यांना सामोरे जावे लागले. यामुळे परीक्षेला पोहोयला त्यांना उशीर झाला आणि परीक्षा केंद्रावर त्यांना परीक्षेस बसण्यास मज्जाव करण्यात आला. यामुळे 30 ते 40 विद्यार्थ्यांना वाहतूक कोंडीचा नाहक त्रास सहन करावा लागत आहे.
जेव्हीएलआरची वाहतूक कोंडी मुंबईकरांसाठी काही नवीन नाही. सकाळी कामाला जाण्याच्या वेळेत आणि संध्याकाळी कार्यालये सुटल्यावर इथे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत असते. पवई भागात मोठ्या प्रमाणात इंडस्ट्रीयल इस्टेट आहेत. त्यामुळे या दिशेने कामानिमित्त येणाऱ्यांची संख्या जास्त असते. लहान रस्ते, गाड्यांची वाढलेली संख्या, रिक्षा वाल्यांना असलेली घाई या रस्त्यावर नेहमी दिसत असते. एकमेकांच्या पुढे पळण्यासाठी स्पर्धा या रस्त्यांवर पाहायला मिळते. नेहमीच्या प्रवाशांसाठी हे तोंडपाठ असल्याने ते घरातून त्या वेळेप्रमाणे निघतात. पण राज्यभरातून आलेल्या परिक्षार्थीचा मुंबईच्या रस्त्यावरील अंदाज चुकला आणि ते प्रचंड वाहतूक कोंडीत अडकले.
या गोंधळामुळे परीक्षार्थींच्या भवितव्याचा प्रश्नही निर्माण झाला आहे. परीक्षेसाठी प्रचंड मेहनत करुन आम्ही आलो होतो पण वाहतूक कोंडीमुळे परिक्षाकेंद्रा पर्यंत पोहोचण्यास उशीर झाला. यासंदर्भात आम्ही परीक्षा केंद्राला माहिती दिली पण आम्हाला कोणी दाद न दिल्याचे या परीक्षार्थींनी सांगितले. दरम्यान या विद्यार्थ्यांच्या परीक्षा पुन्हा घेणार का ? याबाबत प्रश्नचिन्हच आहे.