Gokhale Bridge: अंधेरी पूर्व आणि पश्चिमेला जोडणाऱ्या गोखले पुलाची एक लेन वाहतुकीसाठी खुली झाली आहे. 15 महिन्यांच्या दीर्घ प्रतीक्षेनंतर गोखले पूल मुंबईकरांसाठी खुला झाला आहे. पुलामुळं आता विलेपार्ले, जोगेश्वरी भागातील वाहतुक कोंडी कमी होणार आहे. पण सध्या या पुलावरुन प्रवास करताना काही नियम पाळावे लागणार आहेत. गोखले पुलावरुन सध्या फक्ता हलक्या वाहनांना प्रवास करता येणार आहे. तर, अवजड वाहनांना पुलावरुन प्रवासासाठी परवानगी नाहीये.
गोखले पुल धोकादायक ठरल्याने 7 नोव्हेंबर 2020 रोजी पुर्नबांधणीसाठी बंद ठेवण्यात आला होता. त्यानंतर तब्बल 2 वर्षांनी म्हणजे 2023मध्ये पुलाचे बांधकाम सुरू करण्यात आले होते. पालिकेने 14 महिन्यात पुलाचे बांधकाम पूर्ण केले आहे, पुलाचा पहिला टप्पा सुरू करण्यात आला आहे. पहिला टप्पा सुरू झाल्याने वाहन चालकांना पश्चिम ते पूर्व असा प्रवास करणे शक्य होणार आहे. मात्र पहिल्या टप्प्यात फक्त हलक्या वाहन चालकांनाच परवानगी देण्यात येत आहे. प्रकल्पाचे दोन्ही टप्पे पूर्ण झाल्यानंतर पूलावरुन अवजड वाहनांना परवानगी देण्यात देण्यात येणार आहे.
गोखले पुलाची एक लेन सुरू झाल्यामुशं विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक यांनाही सोयीचे ठरणार आहे. तसंच, या पुलामुळं इंधनाची बचत आणि वेळदेखील कमी होणार आहे, असं महापालिकेने म्हटलं आहे. दरम्यान गोखले पुलाचा पहिला टप्पा वाहतुकीसाठी खुला करण्यात आल्यानंतर हलक्या वाहनांच्या सोयीसाठी वाहतुकीचे नियोजन मुंबई वाहतूक पोलिसांकडून करण्यात आली आहे.
दरम्यान, पुलाचे बांधकाम सुरू असताना रेल्वेच्या नवीन धोरणामुळं जुन्या पुलाचे पाडकाम करुन उभारण्यात आलेल्या नवीन पुलाची उंची दीड मीटरने वाढवण्यात येणार आहे. रेल्वे ट्रॅकवरील पुलाची उंची वाढवावी लागली आहे. त्यामुळं बर्फीवाला कनेक्टर आणि गोखले पुल यांच्यातील उंचीचा फरक असमान झाला आहे. याबाबत आयआयटी मुंबई आणि व्हीजेटीआय संस्थेतील तज्ज्ञांचा सल्ला घेण्यात आला आहे. त्याबाबत 15 दिवसांतच अहवाल सादर करण्यात येणार आहे.
बर्फीवाला कनेक्टर आणि गोखले रोड जोण्यासाठी रॅम्प बांधण्याचे काम करण्यात येणार आहे, अशी माहिती मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त इक्बालसिंह चहल यांनी दिली आहे. दरम्यान, गोळले रोडचा संपूर्ण प्रकल्प 31 डिसेंबर 2024 पर्यंत पूर्ण होणार आहे.