Video: विठ्ठलाची मूर्ती भेट देणाऱ्या महिलेला अजित पवारांचा भन्नाट प्रश्न; म्हणाले; 'रुक्मिणीला...'

Maharashtra Assembly Election Ajit Pawar Video: अजित पवार हे आपल्या हजरजबाबीपणासाठी ओळखले जातात. खास त्यांच्या शैलीमध्ये त्यांनी केलेली विधाने चांगलीच चर्चेत असतात.

स्वप्निल घंगाळे | Updated: Nov 26, 2024, 03:41 PM IST
Video: विठ्ठलाची मूर्ती भेट देणाऱ्या महिलेला अजित पवारांचा भन्नाट प्रश्न; म्हणाले; 'रुक्मिणीला...' title=
अजित पवारांचा प्रश्न ऐकून पिकलं एकच हसू

Maharashtra Assembly Election Ajit Pawar Video: राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे सध्या चांगलेच चर्चेत आहेत. अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने विधानसभा निवडणुकीमध्ये दमदार कामगिरी केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उभी फूट पडून अजित पवारांनी वेगळी चूल मांडल्यानंतर राज्यातील पहिल्याच मोठ्या निवडणुकीमध्ये अजित पवारांच्या पक्षाने चुलते शरद पवारांच्या पक्षावर मात केल्याचं आकडेवारीवरुन स्पष्ट होत आहे. शरद पवारांच्या पक्षाला विधानसभेमध्ये केवळ 10 जागा मिळालेल्या अशतानाच अजित पवारांच्या पक्षाने तब्बल 41 जागांवर विजय मिळवला आहे. या विजयानंतर अजित पवारांच्या चेहऱ्यावरील हसू पुन्हा खुलल्याचं निकालापासून पाहायला मिळत आहे. मुळात अजित पवार हे त्यांच्या हजरजबाबीपणासाठी ओळखले जातात. त्याच्या हाच हजरबबाबीपणाचा नमुना नुकताच त्यांच्या शासकीय निवासस्थानी पाहायला मिळाला.

भेटीसाठी आलेल्यांकडून खास वस्तू मिळाली गिफ्ट

झालं असं की, विधानसभेतील मोठ्या विजयानंतर अजित पवार यांना भेटण्यासाठी त्यांचं शासकीय निवासस्थान असलेल्या 'देवगिरी' बंगल्यावर कार्यकर्त्यांची ये-जा सुरु आहे. आजही सकाळी सकाळीच कार्यकर्त्यांनी 'देवगिरी'वर मोठी गर्दी केल्याचं पाहायला मिळालं. महायुतीला तसेच अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला मिळालेल्या यशाबद्दल अभिनंदन करण्यासाठी कार्यकर्त्यांची मोठी गर्दी केल्याचं दिसून आलं. यावेळी कार्यकर्त्याकडून पवारांना विठ्ठल मूर्तीची भेट देण्यात आली. महिलांनी अजित पवारांच्या हाती विठ्ठलाची मूर्ती दिली.

नक्की वाचा >> 'शिंदे फडणवीसांना CM करण्यासाठी तयार नसले तर आमच्याकडे...'; आठवलेंचा थेट इशारा

अजित पवारांचा भन्नाट प्रश्न अन् नंतर केला बायकोचा उल्लेख

अजित पवारांना आधी तुळशीच्या पानांचा भलामोठा हार घालण्यात आला. त्यावेळी त्यांनी आपल्या सुरक्षा रक्षकांना, 'ऐ तसाच धरा हा, मी मूर्ती घेतो,' असं म्हटलं. त्यानंतर सुरक्षा रक्षकांनी हा हार पकडून ठेवला. मूर्ती स्वीकारताना अजित पवारांनी, 'रुक्मिणीला कुठं सोडलं?' असा प्रश्न विचारल्यावर एकच हशा पिकला. यावर मूर्ती देणाऱ्या महिलेने, 'वहिनींना द्यायची आहे. रुक्मिणी आणली आहे,' असं सांगितलं. त्यावर अजित पवारांनी, 'वहिनींना सांगा,' असं उत्तर दिलं. 

कराडमध्ये अजित पवारांनी घेतली पत्रकाराची फिरकी

सोमवारी कराडमध्ये प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना जरा मोठं मन दाखवून तुम्ही विरोधी पक्षनेता पद देणार का? असा प्रश्न एका पत्रकाराने विचारला असता अजित पवारांनी वर आकाशाकडे पाहत हसतच हातवारे करत, "आमचं मोठं मन आता पार फुटायला लागलंय," असं उत्तर दिलं.हे उत्तर ऐकताच पत्रकारांमध्ये एकच हशा पिकला.

नक्की वाचा >> राजकीय घडामोडींना वेग! रात्री 12.53 AM ला CM शिंदेंची पोस्ट; म्हणाले, 'अशा पद्धतीने माझ्या...'

"तुम्ही अगदी सोयीचं विचारता. केंद्रामध्ये 54 च्या वर आकडा गेल्याशिवाय विरोधी पक्षनेता पद मिळतं का? मग इथं कशी अपेक्षा करता?" असा सवाल अजित पवारांनी विचारला. त्यावर अन्य एका पत्रकाराने, "सक्षम लोकशाहीसाठी पाहिजे ना दादा?" असं म्हटलं. यावर अजित पवारांनी खोचकपणे त्याच्याकडे पाहत, "हो... हो तुलाच करायचं आहे ते," असं म्हणताच सर्वजण हसू लागले.