शार्क टँक इंडिया सीझन 4 सध्या वेगवेगळ्या कारणांमुळे चर्चेत आहे. आपल्या नाट्यमय खेळी, धाडसी मूल्यांकन आणि अविस्मरणीय क्षणांमुळे त्याची चर्चा सुरु आहे. दरम्यान, सोशल मीडियावर शार्क टँकमधील आणखी एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. या शोमध्ये कल्चर सर्कलचा सह-संस्थापक देवांश जैन 10 लाखांचे स्नीकर्स घालून आले होते. त्याच्या स्नीकर्सच्या निवडीमुळे शार्क टँकमधील जज फक्त आश्चर्यचकितच झाले नाहीत तर त्यांच्यात लक्झरी, उद्योग आणि उद्योजकता यावर गंभीर चर्चाही छेडली.
आयआयएम अहमदाबादचे पदवीधर देवांश (26) आणि अक्षय जैन (27) यांनी कल्चर सर्कलची सुरुवात केली आहे. या प्लॅटफॉर्मवर लक्झरी आणि डिझायनर कपडे, शूज, बॅग्ज आणि अॅक्सेसरीजची पुनर्विक्री करु शकतो. 240 कोटींच्या मूल्यांकनासह, त्यांनी फक्त 0.5 टक्के इक्विटीसाठी 1.2 कोटींची मागणी केली आहे. दरम्यान यावेळी देवांशने घातलेल्या डायर एअर जॉर्डन स्नीकर्सने (Dior Air Jordan sneakers) त्यांच्या पिचला आणखी आकर्षक केलं.
BoAt चा सह-संस्थापक शार्क अमन गुप्ताचं लक्ष देवांशच्या महागड्या शूजवर पडल्यानंतर तो स्वत:ला रोखू शकला नाही. "देवांशने घातलेले शूज 10 लाख रुपयांचे आहेत," असं त्याने सांगितलं. हे ऐकताच इतर शार्क स्तब्ध झाले. नमिता थापरने "काय?" असं विचारत आश्चर्य व्यक् केलं. तर तर कुणाल बहल विनोदीपणे म्हणाला, "मी माझ्या सर्व शूजची किंमत एकत्र केली तरी ती 10 लाख होणार नाही."
देवांशने यावेळी खुलासा केला की ते स्नीकर्स डायर एअर जॉर्डनचे होते, ज्यांची लक्झरी मार्केटमध्ये 10 लाख किंमत होती. यावेळी त्याने हीच संधी साधत आपल्या कल्चर सर्कलचाही उल्लेख केला. “कल्चर सर्कलवर, तुम्हाला ते 6.5 लाखात मिळू शकतात,” असं त्याने सांगितलं. यानंतर गुंतवणूकदार हसू लागले. परंतु कंपनीच्या अद्वितीय मूल्य प्रस्तावाचाही उल्लेख झाला.
दरम्यान मूल्यांकनामुळे काही शार्क कंपन्यांना धक्का बसला नाही. शुगर कॉस्मेटिक्सच्या सह-संस्थापक विनीता सिंग यांनी हा प्रस्ताव मूर्खपणाला असल्याचं म्हटलं. ज्यांच्याकडे आधीच 17 कोटींचे बँक रिझर्व्ह आहेत, ते उद्योजक शार्क टँक इंडियाचा वापर करून अशा व्यवसायासाठी मोफत प्रसिद्धी मिळवत असल्याचा आरोपही तिने केला. विनीता सिंगने अखेर गुंतवणूक करण्यास नकार दिला, ज्यामुळे इतर शार्कमध्ये बोलीयुद्ध सुरू झाले.
शेवटी, कुणाल बहल आणि रितेश अग्रवाल यांनी एकत्र येऊन 3 टक्के इक्विटीसाठी एकत्रित 3 कोटी रुपये देऊ केले. यामुळे स्टार्टअपचे मूल्यांकन 100 कोटी रुपयांपर्यंत कमी झाले, जे संस्थापकांच्या सुरुवातीच्या मागणीपेक्षा खूप कमी होते.